ऐनापूर, निलजी बंधाऱ्यांवर पाणी; वाहतूक बंद

सोमवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस व कोकणातील आंबोली व आजरा भागात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या नदीवरील गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर व निलजी बंधाऱ्यांवर काल रात्री उशिरा पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील भडगाव पुलाखालील नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. मात्र, या मार्गावरील वाहतूक अद्याप सुरळीत सुरू आहे. आज दिवसभर तालुक्यात सर्वत्र संततधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गडहिंग्लज तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे. या पावसाने शेतवाडीत पाणी साचले आहे.