पंजाब-गुजरातचा विजय हा 2027 च्या निवडणुकीची सेमीफायनल – अरविंद केजरीवाल

पंजाब आणि गुजरातच्या विधानसभा पोटनिवडणुकीत आपने मिळवलेला विजय म्हणजे 2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठीची सेमीफायनल आहे, असे सांगतानाच पुढील विधानसभा निवडणुकीत दोन्ही राज्यात आम आदमी पार्टीचे सरकार येईल, असा विश्वास दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला. गुजरातच्या विसावदर आणि पंजाबच्या लुधियाना विधानसभा पोटनिवडणुकीत आपने मिळवलेल्या विजयानिमित्त आयोजित जल्लोष कार्यक्रमात केजरीवाल बोलत होते.

विधानसभा पोटनिवडणुक ही आपल्यासाठी 2027 च्या निवडणुकीची सेमीफायनल होती. 2027 च्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये आम आदमी पार्टी 100 हून अधिक जागा जिंकेल असे केजरीवाल म्हणाले. गुजरातची जागा जिंकलेले गोपाल इटालीया आणि लुधियाना पश्चिमची जागा जिंकलेल्या संजीव अरोरा यांचे केजरीवाल यांनी अभिनंदन केले.