Google ने Youtube च्या नियमांमध्ये केला मोठा बदल, लाखो कंटेंट क्रिएटर्सला बसणार फटका

गूगलने आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरील लाइव्ह स्ट्रीमिंगच्या नियमात मोठा बदल केल्याचं जाहीर केलं आहे. नव्या नियमांनुसार, 16 वर्षांखालील मुलांना आता यूट्यूबवर स्वतंत्रपणे लाइव्ह स्ट्रीमिंग करता येणार नाही. हा बदल मुलांना ऑनलाइन अधिक सुरक्षितता प्रदान करण्याच्या उद्देशानं करण्यात आला आहे, असं सांगण्यात येत आहे. हा नवा नियम 22 जुलै 2025 पासून लागू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याआधी यूट्यूबवर लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी किमान वय 13 वर्षे होतं. आता हे वय 16 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. याचा परिणाम जगभरातील लाखो यूट्यूबर्सवर होणार आहे, ज्यांचं वय 16 वर्षांपेक्षा कमी आहे. विशेषतः जे गेमिंग, व्हलॉगिंग किंवा इतर कंटेंट लाइव्ह स्ट्रीम करतात. या बदलामुळे 16 वर्षांखालील युजर्सना लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी पालक किंवा प्रौढ व्यक्तीच्या देखरेखीची आवश्यकता असेल.

गूगलने हा बदल मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी केल्याचं सांगितलं आहे. यूट्यूबवर लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान होणारे संभाव्य धोके, जसं की अनुचित टिप्पण्या किंवा गैरवर्तन, यापासून मुलांचं संरक्षण करणं हा यामागील उद्देश आहे, असं सांगण्यात येत आहे.