
सीमा प्रश्न असो किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात मोलाचे योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांच्या योगदानाचा सरकारला विसर पडला आहे. ज्यांनी मुंबईला औद्योगिक नगरी अशी ओळख मिळवून दिली आज त्याच गिरणी कामगारांवर घरासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेलू, वांगणी नको…गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काची मिळाली पाहिजे, अशी मागणी गिरणी कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी बाळ खवणेकर यांनी केली आहे.
गेली अनेक वर्षे गिरणी कामगार आणि संघटना हक्काच्या घरासाठी लढा देत असताना 25 वर्षात केवळ 17 हजार गिरणी कामगारांना घर मिळाले आहे. अजूनही लाखो गिरणी कामगार घरापासून वंचित आहेत. मुंबईत एनटीसीकडे 121 एकर जागा पडून आहेत. त्या जमिनी सरकारने ताब्यात घेऊन योग्य नियोजन करून गिरणी कामगारांच्या घरासाठी योजना राबवावी, अशी मागणी बाळ खवणेकर यांनी केली. गिरण्या बंद झाल्यामुळे मुंबईतला मराठी टक्का घसरला आहे. त्यामुळे सरकारने गिरणी कामगारांना मुंबईतच घर देऊन त्यांना न्याय दिला पाहिजे. जेणेकरून मुंबईतील मराठी माणसाचा टक्का वाढेल, असेही ते म्हणाले.