
गुजरातमधील अहमदाबादमध्ये गेल्या 12 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथे पूरसदृश स्थिती आहे. पूर्वेकडील मणी नगर, बटवा, सिटीएम, हटकेश्वर, निकोल आणि विराट नगरसह अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. तर सुरतमध्ये सलग तिसऱया दिवशीही कमरेपर्यंत पाणी असल्याचे चित्र आहे.
पावसाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात एक दुचाकीस्वार ड्रेनेज लाईनमध्ये अडकला. अग्निशमन विभागाने तब्बल 9 तासांच्या अथक परिश्रमानंतर ड्रेनेज लाईनपासून तब्बल 200 फूट अंतरावर त्याचा मृतदेह बाहेर काढला. यंदाच्या हंगामात आतापर्यंत शहरात तब्बल 6.03 इंच पाऊस पडला आहे. सुरतमध्ये गीता नगर परिसर 3 ते 4 फूट पाण्यात बुडाला. एका गर्भवती महिलेला अग्निशमन दलाच्या पथकाने वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले.
अहमदाबाद-मुंबई महामार्गावर 15 किमीपर्यंत वाहतूक कोंडी
वडोदरा येथे मुसळधार पावसामुळे अहमदाबाद-मुंबई महामार्गावर तब्बल 15 किमी लांबीची वाहतूक कोंडी झाली. राष्ट्रीय महामार्गावरील जांबुवा ब्रिज रोडवर मोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक अक्षरशः मुंगीच्या गतीने पुढे सरकत होती.