बापरे…सहा महिन्यांत 29 धडका, मुंबईच्या आकाशात विमानांना पक्ष्यांचा धोका; तंत्रज्ञान नसल्याने अपघात रोखण्याचे आव्हान

मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या आणि तिथे उतरणाऱ्या विमानांना मागच्या 6 महिन्यांत 29 पक्ष्यांनी धडक दिली आहे. तर मागच्या पाच वर्षांत अशा सुमारे 250 घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची धडधड वाढली असून या घटना रोखण्याचे कुठलेही तंत्रज्ञान नसल्याने प्रशासनाची चिंताही वाढली आहे.

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर मुंबई विमानतळावर विमानांना असलेला अपघातांचा धोका आणि उपाययोजना या विषयावर मंत्रालयात एक बैठक झाली. मुंबई उपनगरातील देवनार, कांजुरमार्ग, वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्र हे मुंबई विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येतात. या डंपिंग ग्राऊंड्सवर मुबलक खाद्य मिळते. तसेच विमानतळाच्या 10 किमी परिसरात कांदळवन व वनक्षेत्र आहे. त्यामुळे या भागांत पक्ष्यांचा मोठय़ा प्रमाणावर वावर असतो. त्याचा फटका मुंबईच्या आकाशातून उड्डाण करणाऱ्या विमानांना बसत आहे. हा धोका कसा टाळता येईल यावर बैठकीत चर्चा झाली.

पक्ष्यांच्या धडका कशा रोखता येतील यावर मार्ग काढण्यासाठी एप्रिल 2024 मध्ये विमानतळ पर्यावरण समितीची बैठक झाली होती, पण त्यानंतर एकही बैठक झालेली नाही. नुकत्याच झालेल्या बैठकीत फनेल झोनमधील वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राचे आधुनिकीकरण, शेड कव्हर दुर्गंधी नियंत्रक प्रणाली, ‘मोबाईल काँम्पॅक्शन युनिट’ची त्वरित स्थापना करण्याचे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशीष शेलार यांनी यावेळी दिले.

3 हजार फुटांवरही विमाने सुरक्षित नाहीत!

मुंबई विमानतळाच्या परिसरात किती फुटांपर्यंत विमानांना पक्ष्यांच्या धडका बसल्या याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार 50 ते 200 फूट उंचीवर विमान असताना तीन पक्षी धडकले होते. विमान 500 फुटांवर असताना वेगवेगळय़ा घटनांमध्ये 16 पक्षी आपटले होते. विमान 500 ते हजार फूट उंचीवर असताना 13 पक्षी धडकले, तर तीन हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर विमान असताना 11 वेळेस धडकले होते.

विमानांना पक्षी धडकण्याच्या घटना  

वर्ष           संख्या

2020      20

2021      35

2022      36

2023      60

2024      59

2025    आतापर्यंत 29