आईच्या अस्थिविसर्जन करायला गेलेल्या मुलावर काळाचा घाला; दोघांचा मृत्यू, हाजी अली येथील धक्कादायक घटना

आईच्या अस्थिविसर्जन करायला गेलेल्या संतोष विश्वेवर (51) यांच्यावर काळाने घाला घातल्याची घटना आज हाजी अलीजवळील लोटस जेट्टी येथे घडली. समुद्राला भरती असतानाही संतोष व त्यांचे दोघे मित्र अस्थिविसर्जनासाठी पाण्यात उतरले आणि घात झाला. भरतीच्या लाटांनी आत ओढल्याने त्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर बुडालेल्या तिसऱ्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढून त्याला नायर इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

संतोष विश्वेवर हे त्यांच्या आईच्या अस्थिविसर्जन करायला आज संध्याकाळी हाजी अली येथील लोटस जेट्टी येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत कुणाल कोकाटे (45) आणि संजय सरवणकर (58) हे दोघे होते. संध्याकाळच्या सुमारास समुद्राला भरती असल्याने जास्त पुढे जाऊ नका असे आवाहन तेथील तैनात पोलिसांनी तिघांना केले. पण आम्ही पालिका अधिकारी असल्याचे सांगत तिघेही अस्थिविसर्जन करायला पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते भरतीच्या लाटेसह आत ओढले गेले. उपस्थित पोलिसांनी मच्छीमारांच्या मदतीने तिघांनाही तत्काळ नायर इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी संतोष आणि कुणाल कोकाटे या दोघांना मृत घोषित केले.