रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला; 477 ड्रोन आणि 60 क्षेपणास्त्रांनी मोठे नुकसान

रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. तीन वर्षांपासून सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धात रशियाने केलेला हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. या हल्ल्यात युक्रेनच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पायलट मृत्युमुखी पडला आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या नाटो शिखर परिषदेनंतर रशियाने हा हल्ला केला आहे. या शिखर परिषदेत जगातील शक्तिशाली देशांनी तीन वर्षांपासून सुरू असलेले हे युद्ध संपवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर रशियाने हा मोठा हवाई हल्ला केल्याने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे.

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले आहेत की ,रशियाने रात्री 537 शस्त्रास्त्रांनी युक्रेनवर हवाई हल्ला केला आहे. त्यात 477 ड्रोन आणि 60 क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. रशियन हल्ल्याला निष्क्रिय करण्यात गुंतलेले एफ-16 विमानाचे पायलट मॅक्सिम उस्टेन्को यांचा मृत्यू झाला. या एफ-16 पायलटने 7 हवाई लक्ष्ये नष्ट केली. रशियाने ज्या ड्रोनने हल्ला केला त्यापैकी बहुतेक ड्रोन इराणमध्ये बनवलेले ‘शाहिद’ ड्रोन होते. रशियाने हे हल्ले निवासी भागात केल्याने मोठे नुकसान झाले आहे. स्मिलामधील एक निवासी इमारतील लक्ष्य करण्यात आले आहे.

मोठे हल्ले करण्याची क्षमता जोपर्यंत रशियाकडे तोपर्यंत ते थांबणार नाही. या आठवड्यातच 114 हून अधिक क्षेपणास्त्रे, 1,270 हून अधिक ड्रोन आणि सुमारे 1,100 ग्लाइड बॉम्ब डागण्यात आले आहेत. जगाच्या शांततेच्या आवाहनाला न जुमानता पुतिन यांनी खूप आधीपासून युद्ध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता हे युद्ध संपवले पाहिजे, असे झेलेन्स्की म्हणाले. झेलेन्स्की यांनी जगातील देशांना हे युद्ध थांबवण्यासाठी पुतिन यांच्यावर दबाव टाकण्याचे आवाहन केले.