हरियाणातील भाजप मंत्र्याच्या बलात्कारी नातेवाईकाने बोगस कागदपत्रे बनवून मिळवला जामीन, कल्याण न्यायालयातील धक्कादायक प्रकार

बलात्कार प्रकरणातील आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे कल्याण न्यायालयातून जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीचा खोटारडेपणा उघड होताच कल्याण न्यायालयाने आरोपीचा जामीन रद्द करत त्याच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी बलराज सिंग हा हरियाणातील भाजपच्या एका माजी मंत्र्याचा नातेवाईक आहे.

कल्याणमधील एका तरुणीची 2022 मध्ये दिल्ली येथे आरोपी बलराज सिंग याच्याशी ओळख झाली होती. पीडितेसोबत झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत बलराज सिंग याने पीडित तरुणीवर बलात्कार केला. 2024 मध्ये याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. दरम्यान बल राज याचा नातेवाईक हरियाणा येथील भाजपचा माजी मंत्री असल्याने त्याने कल्याणमधील एका भाजप नेत्याच्या संपर्कातून तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीवर दबाव टाकला होता. मात्र पीडित तरुणी ठाम राहिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत 9 एप्रिल 2024 रोजी आरोपी बलराज सिंगला अटक केली. त्यानंतर दोन महिन्यांनी मे 2024 मध्ये बलराजचा जामीन मंजूर झाला. जामीन मिळवताना आरोपीने फिरोज कुरेशी या व्यक्तीचा जामीनदार म्हणून दाखला दिला होता.

जामीनदारही अडकला
या प्रकरणाची कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने गंभीर दखल घेत 26 जून रोजी झालेल्या सुनावणीत आरोपी बलराज याचा जामीन तत्काळ रद्द केला. आरोपी न्यायालयात उपस्थित नसल्याने त्याच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी केले आहे. शिवाय खोट्या जामीनदाराच्या विरोधातही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

असा झाला भंडाफोड
पीडितेला जामीनदारबद्दल संशय आला. त्यामुळे पीडितेने माहितीचा अधिकारात कागदपत्रे मिळवली. यामध्ये फिरोज कुरेशी याच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार केल्याचे उघड झाले. त्यामुळे पीडितेने 17 जुलै 2024 रोजी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस तपासात जामीनदाराने दिलेली कर भरणा पावती, रेशन कार्ड, आधारकार्ड क्रमांक खोटा असल्याचे उघड झाले.