भिवंडीच्या पडघा कब्रस्तानात दहशतवादी साकीब नाचन दफन

मुंबईत 2002-2003 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि सिमी, इसीस या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या साकीब नाचन याला आज त्याच्या मूळ गावी भिवंडीच्या पडघ्याजवळील स्मशानभूमीत दफन करण्यात आले. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर दिल्लीतील रुग्णालयात उपचार घेत असताना साकीबचा शुक्रवारी मृत्यू झाला होता.

भिवंडी तालुक्यातील पडघानजीकच्या बोरिवली गावात साकीब नाचन राहत होता. सिमी या संघटनेचा तो महाराष्ट्राचा अध्यक्ष बनला. पाकिस्तानी दहशतवादी संघटना आयएसआयच्याही तो संपर्कात होता. 1990 च्या दशकात त्याचे खलिस्तानी दहशतवाद्यांशी कनेक्शन उघड झाले आणि तो तपास यंत्रणांच्या रडारवर आला. 2002-2003 या दोन्ही वर्षी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील तो आरोपी होता. त्यासाठी दहा वर्षांची शिक्षा भोगून तो पुन्हा बोरिवली गावात परतला होता. त्यानंतर सिरियातील दहशतवादी संघटना इसिसचे मोड्युलर उभे केल्याप्रकरणी एनआयएने त्याला 2003 मध्ये पुन्हा अटक केली. तिहारच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याला ब्रेन स्ट्रोक आला.

दहशतवादी मुलगा शामीलला उपस्थित राहण्यास परवानगी
इसिस मोड्युल प्रकरणात साकीबचा मुलगा शामील यालाही 8 ऑगस्ट 2023 रोजी अटक झाली होती. साकीबच्या दफनविधीला उपस्थित राहण्यास न्यायालयाने परवानगी दिल्याने पोलीस बंदोबस्तात त्याला तळोजा कारागृहातून बोरिवलीत आणण्यात आले होते. सकाळी १० वाजता कब्रस्तानात जनाजाचा नमाज झाला आणि साकीबला दफन करण्यात आले.

बोरिवली, पडघा भागाला पोलीस छावणीचे स्वरूप
साकीबचा मृतदेह बोरिवली गावात आणण्यात येणार असल्याने पडघा पोलिसांसह ठाणे ग्रामीणचे 350 हून अधिक पोलीस बोरिवली आणि पडघा गावात तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर गुप्त वार्ता, एटीएस आणि साध्या गणवेशातील अनेक पोलीस ठिकठिकाणी पाळत ठेवून होते. गावात येणाऱ्या वाहनांची तपासणी करून नोंद करण्यात येत होती.