
जामखेड बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आज जिल्हाधिकाऱयांकडे दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, खरेदी-विक्री संघ, कर्जत दूध संघ, त्यानंतर आता जामखेड बाजार समितीमध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना सहावा धक्का दिला आहे.
शरद कार्ले, सचिन घुमरे, नंदकुमार गोरे, अंकुश ढवळे, विष्णू भोंडवे, गौतम उतेकर, गणेश जगताप, वैजिनाथ पाटील, राहुल बेदमुथ्था, रवींद्र हलगुंडे, सीताराम ससाणे, नारायण जायभाय या सदस्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
त्यात म्हटले आहे की, वराट यांनी कायद्याचे उल्लंघन करून विश्वास गमावलेला आहे. ते मनमानी पद्धतीने कारभार करतात. बाजार समितीच्या उपविधीप्रमाणे कामकाज करताना हेतूपुर्वक आम्ही सुचवलेल्या बाबींकडे दुर्लक्ष करून हेळसांड करतात. बाजार समितीमध्ये येणाऱया शेतकरी, नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून सदस्यांनी सुचवलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. बाजार समितीच्या क्षेत्रातील बाजाराची आर्थिक उन्नती होण्यासाठी, त्याचबरोबर शेतकऱयांच्या मालाला व्यवस्थित सोयी-सुविधा करण्यासाठी कोणतीही मदत करत नाहीत. शासनाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात आलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी व विक्री होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून कोणतीही मदत करत नाहीत. त्यामुळे उपसभापती कैलास वराट यांनी सदस्यांचा विश्वास गमावलेला आहे. त्यांना उपसभापतिपदावरून हटवण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी
करत आहोत.