Wimbledon 2025 – अल्कराझचे वादळ घोंघावू लागले

गेल्या दोन्ही विम्बल्डन स्पर्धांवर आपले वर्चस्व दाखवणाऱया स्पॅनिश कार्लोस अल्कराझचे वादळ घोंगावण्यास सुरुवात झाली आहे. त्याने दुसऱया फेरीत अमेरिकेच्या ऑलिव्हर टार्वेटचा 6-1, 6-4, 6-4 असा सव्वा दोन तासांत फडशा पाडला आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली. तसेच करेन खाचानोव्ह, फ्रान्सिस टिआको, आंद्रे रुबलेव्ह यांनी पुरुष एकेरीत तर, महिला एकेरीत एरिना सबालेंका, मेडिसन कीज, डायना श्नेडर यांनी तिसऱया फेरीत धडक मारली.

सलग तिसऱया विम्बल्डन जेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगून उतरलेल्या अल्कराझने दुसऱया फेरीतही एकही सेट गमावला नाही. पहिला सेट तर त्याने 6-1 असा खिशात घातल्यानंतर टार्वेटने पुढील दोन्ही सेटमध्ये अल्कराझला झुंजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अनुभव कमी पडला.

सबालेंका, कीज तिसऱया फेरीत

विम्बल्डनच्या महिला एकेरीत एरिना सबालेंका व मेडिसन कीज या मानांकित खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे विजयासह तिसऱया फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकित बेलारूसच्या एरिना सबालेंकाने दुसऱया फेरीत झेक प्रजासत्ताकच्या मेरी बोझकोवा हिचा 7-6(7/4), 6-4 असा पराभव केला. तिने ही लढत 1 तास 35 मिनिटांत जिंकली. बोझकोवाने पहिल्या सेटमध्ये तुल्यबळ लढत देत सबालेंकाचा घामटा काढला होता. मात्र, दुसऱया सेटमध्ये तिची दमछाक झाली. दुसरीकडे सहाव्या मानांकित अमेरिकेच्या मॅडिसन कीजने सर्बियाच्या ओग्ला डॅनिलोविच हिचा 6-4, 6-2 असा 1 तास 15 मिनिटांपर्यंत चाललेल्या लढतीत सहज पराभव करत आगेपूच केली.

युकी भांबरीची दुहेरीत विजयी सलामी

युकी भांबरी व रॉबर्ट गॅलोवे जोडीने रोमेन अर्नेओडो व मॅन्युएल गिनार्ड या जोडीचा 7-6(10/8), 6-4 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. हिंदुस्थान-अमेरिकन जोडीने ही लढत 1 तास 49 मिनिटांत जिंकली. पहिला सेट अतिशय चुरशीचा झाला. शेवटी टायब्रेकपर्यंत रंगलेला हा सेट जिंपून भांबरी-गॅलोवे जोडीने सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर दुसऱया सेटमध्येही प्रतिस्पर्धी जोडीचा प्रतिकार मोडून त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केला.