कोल्हापूर जिह्यात गेल्यावर्षीपेक्षा यंदा पावसाचा जोर, पंचगंगेचा फुगवटा गांभीर्याने घेण्याची गरज

जिह्यात पावसाची उघडझाप सुरूच असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जूनमध्येच सरासरी अडीचपट पाऊस झाला आहे. जिह्यात 1 जूनपासून आतापर्यंत तब्बल 377 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत 153 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा पावसाचे सरीसरी प्रमाण अधिक राहिल्याने, धरणातील पाणीसाठाही दुप्पट आणि तिप्पट असाच राहिला आहे. राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगासह जिह्यातील लहान-मोठय़ा अशा एकूण 93.77 टीएमसी क्षमतेच्या धरणसाठय़ात सध्या 63.99 टीएमसी पाणीसाठा झाला आहे, तर जंगमहट्टी, घटप्रभा सर्पनाला, कोदे लपा हे छोटे धरण प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.  कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणीसाठा पाहता सध्या तो नियमापेक्षा अधिक आहे. परिणामी कोल्हापुरातील नद्यांची वाढलेली पाणीपातळी अत्यंत संथ गतीने कमी होताना दिसत आहे, तर शहरातून सांडपाणी वाहून नेणाऱया जयंती नाल्यातील पाणीसुद्धा पंचगंगा नदीत अत्यंत संथगतीने ओसरत असल्याचे चित्र आहे. पाण्याला आलेला फुगवठा गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

कोल्हापूर जिह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. कधी संततधार, तर कधी विश्रांती यामुळे पावसाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. गेल्या आठवडय़ात पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगेची वाटचाल 39 फुटांच्या इशारा पातळीकडे सुरू होती, पण पावसाच्या विश्रांतीमुळे पात्राबाहेर पडलेले पाणी पुन्हा पंचगंगेत जाताच, पुन्हा दोन दिवसांतच दुसऱयांदा पंचगंगेचे पाणी काल पात्राबाहेर पडले, तर पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात एक फुटाची वाढ होऊन सायंकाळपर्यंत पातळी 31 फुटांपर्यंत स्थिर राहिली होती. तसेच जिह्यातील 36 बंधारे पाण्याखाली गेले होते.

जिह्यातील धरणांत गेल्या वर्षी 2 जुलैच्या पाणीसाठय़ाची टक्केवारी, कंसात सध्याचा पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात सध्याची पाणीसाठय़ाची टक्केवारी, तसेच धरणातून होणारा विसर्ग पुढीलप्रमाणे- राधानगरी- 32 टक्के, (5.56 टीएमसी) (67 टक्के) 3100 क्युसेक विसर्ग. तुळशी- 39 टक्के, (2.30) (66 टक्के) 904 क्युसेक. वारणा- 35 टक्के, (25.31) (74 टक्के) 9757 क्युसेक. दूधगंगा- 19 टक्के, (13.23) (52 टक्के) 6496 क्युसेक. कासारी- 34 टक्के, (1.76) (64 टक्के) 637 क्युसेक. कडवी- 51 टक्के, (1.84) (73 टक्के) 825 क्युसेक. कुंभी- 34 टक्के, (1.79) (66 टक्के) 602 क्युसेक. पाटगाव- 45 टक्के, (2.88) (78 टक्के) 658 क्युसेक. चिकोत्रा- 34 टक्के, (0.94) (62 टक्के) 163 क्युसेक. चित्री- 31 टक्के, (1.67) (88 टक्के) 944 क्युसेक. जंगमहट्टी- 42 टक्के, (1.22) 149 क्युसेक. घटप्रभा- 100 टक्के (1.56) (100 टक्के) 2834 क्युसेक. जांबरे- 72 टक्के, (0.82) (100 टक्के) 843 क्युसेक. आंबेओहोळ- 71 टक्के, (1.20) (97 टक्के) 135 क्युसेक.

अलमट्टीच्या पाणीपातळीने धाकधूक वाढली

कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यांतील महापुराला कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणीसाठा नेहमी कारणीभूत राहिला आहे. यंदा अलमट्टी धरणातील पाणीपातळी येत्या 15 ऑगस्टपर्यंत 517.50 मीटरपर्यंत नियंत्रित ठेवावी, असा निर्णय यावर्षीही आंतरराज्यीय बैठकीत घेण्यात आला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने यावर देखरेख ठेवण्यासाठी अधिकाऱयांचीही नियुक्ती केली आहे. एरव्ही जुलैच्या तिसऱया वा चौथ्या आठवडय़ांत 517 मीटरवर जाणारी अलमट्टीची पाणीपातळी यावर्षी जून महिन्यातच 517 मीटरवर गेली आहे. 30 जून रोजी सकाळी ही पाणीपातळी 517.03 मीटरवर गेली असून, धरणात 84.82 टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यानंतर आणखी तीन टीएमसी पाणीसाठा वाढला असून, आज सकाळी अलमट्टीमध्ये 87.737 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या धरणात महाराष्ट्रातील कृष्णा आणि पंचगंगा नदीतून सध्या 85 हजार 537 क्युसेक पाणी जमा होत आहे, तर या धरणातून केवळ 70 हजार क्युसेक पाणी विसर्ग होत आहे. परिणामी पंचगंगा नदीला आलेली फुग आणि अत्यंत संथ गतीने ओसरणारे पाणी पाहता अलमट्टीमधून पाण्याचा विसर्ग वाढविणे गरजेचे बनले आहे.