ठाण्याच्या ‘झोपु’ योजनेत घोटाळा, बोगस लाभार्थ्यांची नावे घुसवली

झोपडपट्टीत राहणाऱ्यांना हक्काची पक्की घरे मिळावीत म्हणून सरकारने ‘झोपु’ (झोपडपट्टी पुनर्वसन) योजना सुरू केली. मात्र ठाण्यातील या ‘झोपु’ योजनेमध्ये घोटाळा झाला असून बोगस लाभार्थ्यांची नावे यादीत घुसवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी व विकासक यांच्या संगनमताने हा घोटाळा झाला असून पालिकेचा समाजविकास विभागाचा कारभारही यानिमित्ताने संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

खोपट येथील गोकुळदास वाडी, मेरी डिसोझावाडी चाळ या झोपडपट्टीची नंदिश्वर को. ऑप. हौ. सोसायटी असून त्यांचे २००५ सालापासून झोपु योजनेंतर्गत पुनर्वसन सुरू आहे. मात्र या योजनेत पात्र – अपात्र यादीत मोठा घोळ झाल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. या झोपु प्रकल्पामध्ये प्रत्यक्षात मूळ 24 झोपडीधारक होते तर यामध्ये जवळपास 11 बोगस नावे घुसवून त्यांना लाभार्थी दाखवण्यात आल्याचा ‘पराक्रम’ करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप महागावकर यांनी आरटीआय अंतर्गत ही बाब उघडकीस आणली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे मागितली दाद
ठाणे शहरातील अनेक झोपु योजनेचा बट्ट्याबोळ भूमाफिया व बिल्डरांनी एकत्र येऊन केला आहे. एसआरए प्राधिकरण तसेच महापालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही बोगस झोपडपट्टीधारकांवर कारवाई करण्यात आली नाही. अखेर खोपट येथील झोपु योजनेच्या संदर्भात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्यात आली असल्याची माहिती महागावकर यांनी दिली.

पात्र ठरवले झोपडपट्टीधारकांना पात्र
ठरवण्यासाठी केवळ भाडेपावती हाच पुरावा ग्राह्य धरला जात नसून इतर वास्तू व वास्तव्याचे पुरावे तपासले जात असल्याचे एसआरए प्रशासनाने माहितीच्या अधिकारात मागवलेल्या उत्तरात स्पष्ट केले. मात्र तरीही अनेक बोगस झोपडीधारकांना भाडेपावती पाहून पात्र ठरवले आहे.

प्रत्यक्षात कारवाई नाहीच
या घोटाळाप्रकरणी स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्या. त्यानंतर अपिलीय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने नोव्हेंबर 2023 मध्ये बोगस झोपडीधारकांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र कुठलीच कारवाई झालेली नसल्याची खंत महागावकर यांनी व्यक्त केली