देशभरात 6 महिन्यांत 107 वाघांचा मृत्यू

देशभरात मागील सहा महिन्यांत 107 वाघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 20 बछडय़ांचा समावेश आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 40 टक्के अधिक आहे आणि पाच वर्षांतील सर्वाधिक आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले. 2021 पासून देशात 666 वाघ मृत झालेत. ही आकडेवारी भविष्यात वाघांच्या संख्येला मोठा धोका असल्याचे मानले जात आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणच्या आकडेवारीनुसार, देशात या वर्षी सहा महिन्यांत 107 वाघ मृत्युमुखी पडले. महाराष्ट्रात 28, तर मध्य प्रदेश 29 वाघांनी प्राण गमावले.

कर्नाटक आणि आसाममध्ये प्रत्येकी 10-10 वाघांचा मृत्यू झाला.  केरळमध्ये 9, तर उत्तराखंडात 7 वाघांनी प्राण सोडले.

107 पैकी 60 वाघांचा मृत्यू अभयारण्याच्या बाहेर, तर 47 वाघांचा मृत्यू अभयारण्याच्या आत झाला.

26 जून रोजी कर्नाटकच्या एमएम हिल्स हुग्याम रेंज येथे वाघीण आणि तिचे चार बछडे मरण पावले. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.