सुनील प्रभू यांना पितृशोक, उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रभू कुटुंबीयांचे सांत्वन

शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांचे वडील वामन प्रभू यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वामन प्रभू यांचे अंत्यदर्शन घेतले व कुटुंबीयांचे सांत्वन केले.

 शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अशी ओळख असलेल्या वामन प्रभू यांनी वजन व माप खात्यात प्रदीर्घ यशस्वी सेवा केली. त्यांच्या प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सेवेमुळे ते आदरणीय मानले जात. निवृत्तीनंतरही ते कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्समधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय राहून समाजसेवेत आपलं योगदान देत होते. वामन प्रभू यांच्यावर बोरिवली पूर्व येथील दौलतनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार अजय चौधरी, आमदार मिलिंद नार्वेकर, उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते अमोल कीर्तिकर, आमदार अनंत (बाळा) नर, मनोज जामसुदकर, महेश सावंत, विलास पोतनीस, प्रकाश सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.