
शासनाच्या आरोग्य विभागाच्या योजना कागदावरच असल्याने शहापूर तालुक्यात कुपोषणाचा विळखा अधिकच घट्ट होत आहे. केवळ आपत्ती व्यवस्थापन टीमच्या तत्परतेमुळे ढेंगणमाळ गावातील एका तीन महिन्यांच्या तीव्र कुपोषित बालिकेला तातडीचे उपचार मिळाले. या बालिकेवर ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या जीवाचा धोका टळला आहे.
कसाराजवळील ढेंगणमाळ येथील संतोष भला व ताई भला यांना पाच मुली व एक मुलगा अशी अपत्ये आहेत. यातील शेवटची तीन महिन्यांची मुल गी तीव्र कुपोषित असूनही पैशांअभावी वैद्यकीय खर्च परवडत नसल्याने कुटुंबीय बाळाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करीत होते. ही माहिती आपत्ती व्यवस्थापन टीम कसाऱ्याचे सदस्य श्याम धुमाळ, सुनील करवर, सतीश खरे यांना समजतातच त्यांनी नायब तहसीलदार वसंत चौधरी व स्नेहा फाऊंडेशनच्या धनश्री साळुंखे यांना याबाबतची कल्पना दिली. यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी वैद्यकीय अधिकारी आशू शुक्ला, डॉ. रोहन निर्मल, रुग्णवाहिकाचालक सतीश खरे, पोलीस कर्मचारी विनोद खादे, अण्णा पगार, रोहिणी बागुल यांना सोबत घेत ढंगणमाळ गाठले. तिथे गेल्यावर कुपोषित मुलीच्या पाल कांनी गोंधळ घालत मुलीला रुग्णाल यात घेऊन न जाण्यास विरोध केला. मात्र उपचाराच्या खर्चाची जबाबदारी घेण्याची हमी देत कुपोषित बालिकेला ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
कुपोषण निवारण कागदावरच
शहापूर तालुक्यात कुपोषणचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी शासनाने अनेक संस्थांना कामे दिली आहेत, पण या संस्था कागदावरच काम करत असल्याने कुपोषण निवारण कुचकामी ठरत आहे.