पालघरमध्ये पावसाची ‘आषाढवारी’, ठाण्यासह वसई, विरारला झोडपले; रस्त्यांच्या झाल्या नद्या

आषाढी एकादशीनिमित्त एकीकडे विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकऱ्यांचे डोळे लागले असतानाच पालघरमध्ये पावसाने ‘आषाढवारी ‘चे अनोखे दर्शन घडवले. ठाण्यासह वसई, विरारला मुसळधार पावसाने झोडपले असून रस्त्यांच्या अक्षरशः नद्या झाल्या आहेत. पहाटेपासूनच वरुण राजाने आषाढीचा मुहूर्त साधत तुफान वृष्टी केली असून बळीराजा आनंदीत झाला आहे. पण शहरी भागात मात्र घरे आणि बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन ठप्प झाले. धरणे ओसंडून वाहू लागली असून पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या तुफानी पावसाने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज गायब करून टाकली. असंख्य झाडे कोसळली असून त्यात काही घरांचेही नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाने वसई, विरार परिसरात जोरदार हजेरी लावली. नालासोपाऱ्यातील गालानगर, संकेश्वर रोड, आचोळे रोड तसेच वसईतील पापडी, रेल्वे स्थानक परिसर, माणिकपूर अशा भागातील रस्त्यांवर जणू नद्या वाहत होत्या. तर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. महापारेषणच्या पॉवर स्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे अडीच ते तीन तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला. आषाढी एकादशीनिमित्त देवदर्शनासाठी बाहेर पडलेल्या भाविकांना पावसामुळे त्रास सहन करावा लागला.

पांढरतारा पूल पाण्याखाली
तानसा नदीवरील उसगाव ते भाताणेदरम्यानचा पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे अनेक गावे व पाड्यांचा संपर्क तुटला असून यंदाच्या पा-वसाळ्यात तिसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. तानसा खाडीवरील खानिवडे बंधारादेखील पाण्याखाली होता तर चांदीप, नवसई, शिवणसई, पारोळ, शिरवली, खानिवडे, कोपर भागातील शेतांमध्ये नदीचे पाणी घुसल्याचे दिसून आले.

ठाणे, कर्जतमध्ये झाडे कोसळून घरांचे नुकसान
सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस यामुळे पाथरज आणि खांडस येथे घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले. त्यात दोन वृद्ध महिला जखमी झाल्या असून दोन चिमुकली मुले थोडक्यात बचावली आहेत. ठाण्यातही अनेक गाड्यांवर झाडे पडल्याने नुकसान झाले. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर या भागांतही पावसाने रौद्ररूप धारण केले होते.

जव्हारमध्ये पावसामुळे माडविहिरा व हुंबरण या गावपाड्यावरील रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी, प्रामस्थ, वाहनचालक बंगा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून रुग्णांचेही हाल होत आहेत.

मोखाडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत असून शेतीची कामे ठप्प झाली आहेत. तर मध्य वैतरणा धरण 277 मीटरपर्यंत भरले आहे.

भिवंडीतील बाजारपेठ, तीन बत्ती या भागात पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच त्रैधातिरपीट उडाली. शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम झाला.