
घोडबंदरचा ‘खड्डे’तर प्रवास करताना रोजच प्रवासी व वाहनचालकांच्या नाकीनऊ येत आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वळसा घालून जा.. पण घोडबंदरचा प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ खुद्द वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यावर आली आहे. घोडबंदर रस्त्याचा वापर शक्यतो टाळा आणि पर्यायी रस्त्याचा वापर करा, असे आवाहनच त्यांनी केल्यामुळे ठाणेकरांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. आधीच मेट्रोची कामे संथगतीने सुरू असतानाच सर्व्हिस रोडदेखील खोदून ठेवल्याने अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी दीड ते दोन तास रखडपट्टी होत आहे.
मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर मार्ग महत्त्वाचा जात आहे. गेल्या काही वर्षांत घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले असून वाहनांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. कासारवडवली येथील उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू असून सर्व्हिस रोडदेखील मूळ रस्त्याला जोडला जात आहे. त्यामुळे या भागात अक्षरशः कासवाच्या गतीने वाहने धावतात. हे लक्षात घेऊन प्रवाशांनी वडवली, आनंदनगर, हिरानंदानी येथे जाण्याकरिता कोलशेत रोडमार्गे प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे. त्यामुळे वाहनचालकांना ब्रह्मांड सर्कल, विजय गार्डन, महापालिका आयुक्त बंगला या मार्गाने मोठा वळसा घालावा लागत आहे.
काँग्रेसचे खड्डे भरो आंदोलन
आज रविवार सुट्टीचा दिवस असूनही घोडबंदर मार्गावरील कासारवडवली ते डोंगरी पाडा यादरम्यान वाहनांच्या ल बिच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, सर्व्हिस रोडची लागलेली वाट याविरोधात आज काँग्रेसच्या कार्यकत्यांनी ‘खड्डे भरो व भीक मागो’ आंदोलन केले.
मेट्रोच्या कामासाठी 9 जुलैपर्यंत रात्री 11 ते सकाळी या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी घोडबंदर मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडण्याची शक्यता आहे.
अवजड वाहनांसह अन्य वाहनेदेखील वळसा घालून जाणार असल्याने पर्यायी रस्त्यांवरही वाहतूककोंडी होणार आहे. कापूरबावडी सर्कलमार्गे घोडबंदर, कोलशेत तसेच भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना ‘गोल्डन क्रॉस’ येथे बंदी घालण्यात आली आहे.