संतांचे विचार सांगणे जर नक्षलवाद असेल तर असे हजारो आरोप अंगावर घ्यायला तयार – ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर

वारीमध्ये नास्तिक आणि अर्बन नक्षल घुसल्याचा आरोप मिंधे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी केला होता. वारीमध्ये प्रबोधनात्मक कीर्तन करणारे ह.भ.प श्यामसुंदर सोन्नर महाराज म्हणाले  की, संतांचे विचार सांगणे जर नक्षलवाद असेल तर असे हजारो आरोप अंगावर घ्यायला तयार आहोत. तसेच त्या वेळेला तुकाराम महाराजांचे विचार लोकांना पटले नाही त्याच प्रवृत्तीचे लोक आजही समाजात आहेत असेही महाराज म्हणाले

अभिव्यक्ती या युट्युब चॅनेलला मुलाखत देताना श्यामसुंदर महाराज म्हणाले की, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, जनाबाई यांचे विचार सांगतोय. हे विचार त्यावेळच्याही काही लोकांना आवडले नव्हते.

तुकाराम महाराजांनी सांगितलेलं याता याती धर्म नाही विष्णुदास असेल किंवा यारे यारे लहान थोर बलते याती नारीन असेल की सगळ्यांनी समान पातळीवर राहिलं पाहिजे. कुणीच उच्च असणार नाही कोणीच खालचा असणार नाही. सगळे तुम्ही एक पातळीवर आहात अशी सुव्यवस्था निर्माण झाली पाहिजे, असे विचार मांडणारे तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आणि ते अभंग तसे त्यावेळच्या लोकांना टोचले, बोचले आणि त्यांनी काय केलं आपल्या सर्वांना माहिती आहे. तुकाराम महाराजांना आपल्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवायला लागली. नामदेव महाराजांना सुद्धा जाती व्यवस्थेच्या चटके बसलेले आहेत.

आज 21 व्या शतकात आणि खासदार राहिलेल्या एका माणसाला रामनवमीच्या दिवशी त्याने सोहळं नेसलं नाही म्हणून त्याला दर्शन घेऊ दिलं नाही. ही जर 21व्या शतकामधली परिस्थिती असेल तर मग बाराव्या शतकामध्ये काय अवस्था असेल? नामदेव महाराजांना कीर्तन करू दिले नाही. तेव्हा नामदेव महाराज खिन्न झाले आणि पंजाब मध्ये आले. नामदेव महाराजांनी देवाला प्रश्न केला की न दीन जात मोरी पंढरी के राया ऐसा तुम ने नामा दरजी कायकू बनाया अरे देवा मी तुझं कीर्तन करू शकत नाहीये असला नामदेव तू कशाला बनवलास. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून शेवटी ज्यांनी त्यांना मंदिरातून जायला सांगितलं होतं त्यांना ते सांगतात की नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध तुम कहा के बहान हम कहा के सूद. तुम्ही कशाचे ब्राह्मण आम्ही कशा शुद्र आहोत. तुम्ही एकाच देवाचे लेकरं म्हणत हे केल्यामुळे नामदेव महाराजांना त्रास झाला. जनाबाईला मारहाण करण्यात आली. हे जे त्यांनी अभिव्यक्त केलेले आहे ते आपल्यापर्यंत पोहोचल नसतं. या संतांचे विचार दिंडीमध्ये सांगितल्यानंतर हे सगळे विचार आपल्याला संविधानामध्ये दिसतात. मग ज्या प्रवृत्तींना ज्या मंबाजीना तुकाराम महाराजां सहन झाले नाहीत ज्या प्रवृत्तींना त्यावेळेच्या पंढरपुरामध्ये चोखामेळ्यांच राहणं सहन झालं नाही. ज्या प्रवृत्तीना जनाबाईच इथलं नेतृत्व सहन झालं नाही, त्याच प्रवृत्तीचे लोक आजही समाजामध्ये आहेत. त्यांना आजही या आपल्या संतांच्या विचाराचे चटके बसतात त्यांना हे विचार बोचतात टोचतात. म्हणून त्यांनी अशा प्रकारचा आता आम्हाला नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर संत विचार सांगणे नक्षलवाद असेल तर असे नक्षलवादाचे हजारो आरोप आम्ही अंगावर घ्यायला तयार आहोत असेही श्यामसुंदर महाराज म्हणाले.