
स्पेनचा स्टार खेळाडू कार्लोस अल्कराझने रशियाच्या आंद्रेई रूबलेव्हचा कडवा प्रतिकार 6-7 (5), 6-3, 6-4 6-4 असा मोडीत काढत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. द्वितीय मानांकित अल्कराजने या विजयासह स्पर्धेत लागोपाठ 22व्या विजयाची नोंद करीत विम्बल्डनच्या सलग तिसऱया किताबावर नाव कोरण्याच्या दिशेने जोरदार आगेकूच केली आहे. रूबलेव्हने पहिल्या सेटमध्ये 4-1 अशी आघाडी घेत अल्कराझला अचंबित केले होते. रशियन खेळाडूने टाय्रबेकपर्यंत ताणलेला पहिला सेट जिंकण्यात यश मिळविले. मग खडबडून जागे झालेल्या अल्कराझने संयमाने खेळ करीत दुसऱया सेटमध्ये बाजी मारली. त्यानंतर तिसऱया व चौथ्या सेटमध्ये त्याचे लढतीवर नियंत्रण दिसले. त्याने चुका टाळत हे दोन्ही सेट जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. आता उपांत्यपूर्व लढतीत अल्कराझची गाठ ब्रिटनच्या पॅमरन नॉरी याच्याशी पडेल. या विजयासह अल्कराझने आपणच हिरवळीच्या कोर्टवरील बादशहा असल्याचे दाखवून दिले.




























































