
21 वर्षांपूर्वी ब्रायन लाराने रचलेल्या 400 धावांच्या विश्वविक्रमापासून वियान मुल्डर 33 धावा दूर होता. त्याला तो नवा इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी होती; पण त्याने क्रिकेटविश्वातील महान फलंदाज लाराच्या त्या अद्वितीय खेळीला आदर देत आपला संघाचा डाव घोषित करण्याचा अकल्पनीय निर्णय घेत क्रिकेट इतिहासात एक अनोखी खिलाडू वृत्ती दाखवली.
कर्णधार केशव महाराजला झालेल्या दुखापतीमुळे हंगामी कर्णधारपद लाभलेल्या वियान मुल्डरने नाबाद 367 धावा ठोकत अनेक विक्रमांना मोडीत काढले. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱया कसोटीत आफ्रिकेचा संघ उपाहाराला 5 बाद 625 अशा मजबूत स्थितीत होता. मुल्डरचा झंझावात पाहाता तो ब्रायन लाराचा 21 वर्षांपूर्वीचा नाबाद 400 धावांचा विश्वविक्रम सहज मागे टाकणार असे साऱयांनाच वाटत होते; पण उपाहारानंतर मुल्डर आणि दक्षिण आफ्रिकन संघ फलंदाजीला उतरलाच नाही. कर्णधार मुल्डरने उपाहारानंतरच आश्चर्यकारकरीत्या डाव घोषित करत लाराचा विश्वविक्रम अबाधित ठेवण्यातच धन्यता मानली. लारा क्रिकेटचा दिग्गज आहे आणि त्याचा विश्वविक्रम अबाधित राहायला हवा, म्हणून मी हा निर्णय घेतला. मला भविष्यात पुन्हा संधी मिळाली तर मी पुन्हा असेच करेन, म्हणत त्याने लाराच्या विश्वविक्रमाला मानाचा मुजरा करताना आपलीही खेळी अजरामर केली.
काल 264 धावांवर नाबाद खेळत असलेल्या मुल्डरने जोरदार फटकेबाजी केली. त्याने झिम्बाब्वेचा गोलंदाज तनाका चिवांगाच्या चेंडूवर एकेरी धाव काढत 297 व्या चेंडूवर आपले पहिलेवहिले ऐतिहासिक त्रिशतक साकारले. त्यानंतर तो झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडला आणि त्याने पुढील 37 चेंडूंत 11 चौकार आणि 1 षटकार खेचत 67 धावा चोपून काढल्या. उपाहाराला मुल्डर 367 धावांवर नाबाद होता तेव्हा सर्वांच्या नजरा लाराच्या विश्वविक्रमाकडे लागल्या होत्या. कसोटी इतिहासातील सर्वोच्च खेळींच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचलेल्या मुल्डरच्या पुढे फक्त ब्रायन लारा (ना. 400), मॅथ्यू हेडन (380), ब्रायन लारा (375) आणि महेला जयवर्धने (374) या चारच खेळय़ा होत्या. उपाहारानंतर तो या चारही खेळय़ांना मागे टाकत नवा विश्वविक्रम प्रस्थापित करणार असा सर्वांनाच विश्वास होता. पण उपाहारानंतर त्याने लाराला सर्वाधिक धावांच्या सिंहासनावर कायम ठेवले.
मुल्डरचे विश्वविक्रम
- कसोटी इतिहासातील पाचवी सर्वोच्च खेळी आणि 33 वे त्रिशतक आणि 29 वा त्रिशतकवीर फलंदाज.
- शतकी स्ट्राईक रेटने म्हणजेच 297 चेंडूंत त्रिशतक झळकवणारा वीरेंद्र सेहवागनंतर (278 चेंडू) दुसराच फलंदाज.
- कर्णधार म्हणून त्रिशतक ब्रायन लाराने (ना.400) झळकवले होते, तर हंगामी कर्णधार म्हणून खेळत असलेल्या वियान मुल्डरने लाराच्या पंक्तीत आपले नाव नोंदवले.
- हाशिम अमलानंतर (ना. 311) त्रिशतक झळकवणारा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज.