लॉर्ड्सवर वेगवान गोलंदाजांचाच हल्ला, इंग्लंड संघात आर्चर- अ‍ॅटकिन्सनची वर्णी; जोरदार पुनरागमन करण्यासाठी बुमराही सज्ज

लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर फक्त वेगवान गोलंदाजांची चालते, हा इतिहास आहे. जो यंदाही बदलणार नाही. त्यामुळे गेल्या दोन्ही कसोटींत शतकांचा पाऊस पाडणाऱ्या फलंदाजांवर वेगवान गोलंदाजांचाच हल्ला पाहायला मिळणार, हे स्पष्ट आहे. एकीकडे हिंदुस्थानी संघात जसप्रीत बुमराचा दरारा दिसणार आहे तर इंग्लंडने एजबॅस्टनचा पराभव बाजूला ठेवत लॉर्ड्सवर आघाडी मिळवण्यासाठी जोफ्रा आर्चर आणि गस अ‍ॅटकिन्सन या वेगवान गोलंदाजांना सामावून घेतलेय. त्यामुळे क्रिकेटच्या पंढरीवर मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात वेगवान खेळ पाहण्याचे भाग्य क्रिकेटच्या वारकऱ्यांना लाभणार आहे.

लॉर्ड्सवर इंग्लंडचेच पारडे जड आहे, हे सांगायला पुन्हा ज्योतिषाची गरज नाही. हिंदुस्थानचा संघ 19 कसोटी खेळलाय आणि त्यापैकी 12 हरलाय. 4 कसोटींचा निकाल लागला नाहीय म्हणजे केवळ तीन कसोटींत तिरंगा फडकलाय. तोसुद्धा अभिमानाने. गेल्या इंग्लंड दौऱ्यात मोहम्मद सिराजने

लॉर्ड्सवर विजय मिळवून देण्याचा करिश्मा करून दाखवला होता. गेल्या वेळी लॉर्ड्सने हिंदुस्थानला मालिकेत आघाडी मिळवून दिली होती. यंदाही तीच अपेक्षा आहे.

लॉर्ड्सवरील आकडे काहीही सांगत असले तरी गतवेळचा विजय आणि गेल्या कसोटीतला विजय हिंदुस्थानी संघाच्या बाजूने आहे. त्यामुळे ‘लॉर्ड्स हमारा है’ हा आवाज हिंदुस्थानी संघाने आतापासून बुलंद केलाय.

लॉर्ड्स कसोटीसाठी संभाव्य अंतिम संघ

हिंदुस्थान : यशस्वी जैसवाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन/करुण नायर/अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर/शार्दुल ठापूर, आकाश दीप, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज. इंग्लंड : जेकब बेथेल, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), जोफ्रा आर्चर, ब्रायडन कार्स, जोश टंग/गस अ‍ॅटकिन्सन, शोएब बशीर.

वेगवान गोलंदाजी रंगात

लीड्सवरही फलंदाजांची चलती होती तर बार्ंमगहॅमवरही त्यांचाच दबदबा दिसला. पण आकाश दीप आणि मोहम्मद सिराजने हिंदुस्थानचे वेगवान गोलंदाजही रंगात असल्याचे दाखवून दिले होते. पहिल्या कसोटीत बुमराची दहशत इंग्लिश फलंदाजांनी अनुबवी होती. तो पुन्हा आल्यामुळे हिंदुस्थानचे वेगवान त्रिपूट इंग्लिश फलंदाजीला हादरवणार यात तीळमात्र शंका नाही. हिंदुस्थानी वेगवान माऱयाच्या तुलनेत इंग्लंडच्या ख्रिस व्होक्स, ब्रायडन कार्स, जॉश टंग या त्रिपुटाला फारसा प्रभाव पाडता आला नाहीय. त्यामुळे लॉर्ड्ससाठी जोफ्रा आर्चर आणि गस अ‍ॅटकिन्सनला परत आणलेय. परिणामी गेल्या दोन्ही कसोटीत एकच संघ खेळविणारा इंग्लंड तीन-चार बदलांसह उतरणार आहे. गोलंदाजीसह त्यांच्या फलंदाजीतही बदलाची शक्यता वर्तवण्यात आलीय. झॅक क्रावलीचे संघातील स्थान डळमळीत मानले जातेय. त्याची जागा घेण्यासाठी जेकब बेथेल तयार झालाय.

हिंदुस्थानी संघातही बुमरासाठी दोन-तीन बदल अपेक्षित आहेत. फक्त पदार्पणाची संधी अर्शदीप सिंहला मिळतेय की अभिमन्यू ईश्वरनला, याचा फैसला कसोटीच्या दिवशीच लागेल.