Ratnagiri News – सरकारच्या जनहित विरोधी व कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात रत्नागिरी बंद

विद्यमान सरकारच्या जनहित विरोधी व कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात पुकारलेला कामगार व कष्टकरी कर्मचाऱ्यांचा आजचा देशव्यापी बंद रत्नागिरीत यशस्वी झाला.

देशभरातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्रित रित्या देशव्यापी बंदची हाक दिली होती. सार्वजनिक क्षेत्रांचे करण्यात येणारे खासगीकरण, कोणत्याही क्षेत्रामध्ये होत नसलेली नोकर भरती, शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षांचे प्रलंबित व अनुत्तरीत प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या देशभरातील सर्व कष्टकरी कामगारांनी वर्षानुवर्ष झगडून संघर्ष करून लढा देऊन मिळवलेले हक्क पायदळी तुडवणारे व सर्व विद्यमान कामगार कायदे रद्द करून लागू करण्यात येणाऱ्या नवीन चार कामगार संहितांना विरोध या प्रमुख मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. देशामध्ये जर का हे प्रस्तावित नवीन चार कामगार कायदे लागू झाले तर, कोणत्याही क्षेत्रामध्ये, कारखान्यांमध्ये, उद्योगांमध्ये कामगार संघटना स्थापन करणे दुरापास्त होईल. त्याचप्रमाणे संविधानाने दिलेला कामगारांचा संप करण्याचा हक्क देखील पूर्णतः डावलण्यात येईल. तसेच आज मिळणारे किमान वेतन, सामाजिक सुरक्षितता, महिलांना मिळणाऱ्या खास सवलती या सर्व देखील या नवीन कायद्यामुळे संपुष्टात येण्याची भीती आहे. आणि म्हणून समस्त कामगारांचा या नवीन कामगार कायद्यांना कडाडून विरोध आहे.

देशांमध्ये कोट्यावधी तरुण आज बेकार आहेत. रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना रोजगार मिळत नाहीये उलट असलेले रोजगार हिरावून घेतले जात आहेत. विविध ले-आउटच्या माध्यमातून व अन्य कारणांमुळे रोजगारांची शाश्वती संपत चाललेली आहे. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट ही नवीन संकल्पना देशभरात लागू होत चालली आहे. आठवड्याचे कामाचे तास वाढवण्याच्या भाषा विविध माध्यमातून व स्तरांवरून बोलल्या जाऊ लागल्या आहेत. हे सर्व समस्त कामगार कर्मचाऱ्यांनी आजपर्यंतची मिळवलेले सर्व हक्क व सुविधा पायदळी तुडवणारे धोरण आहे आणि म्हणून याला समस्त कामगार संघटनांचा विरोध आहे. आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र यांची तर आज दैनावस्था चालली आहे. महागाई गगनाला भिडलेली आहे. नव्याने रोजगार निर्माण होत नाहीत तर, जुने रोजगार हिरावून घेतले जातात. यासारखी जनहित विरोधी धोरण हे सरकार राबवित आहे. ज्यांना या समस्त कामगार संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

आर्थिक क्षेत्रातील बँकिंग उद्योग व विमा क्षेत्रातील कर्मचारी संघटना देखील आजच्या या बंदमध्ये सहभागी होत आहेत. बँकिंग उद्योगातील ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ही अग्रणी संघटना आजच्या बंदमध्ये सामील झाली आहे. बँकिंग उद्योगाशी संबंधित सार्वजनिक बँकांचे सशक्तिकरण करा, सर्व खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करा, बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात नोकर भरती करा, सर्वसामान्य ठेवीवरील व बचतीवरील व्याजदरामध्ये वृद्धी करा, ग्राहकांवर लादण्यात येणारी विविध सेवाशुल्के रद्द करा, छोटे उद्योजक व समस्त शेतकरी वर्गासाठी कमीत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करण्यात यावीत, थकीत कर्जांच्या वसुलीसाठी कठोर कायदे करावेत व हेतू पुरस्कार बँक कर्ज थकविणे हा फौजदारी गुन्हा समजण्यात यावा या व अन्य विविध मागण्या कर्मचाऱ्यांनी या बंदमध्ये केल्या आहेत. या बंदचे व निदर्शनांचे नेतृत्व विनोद कदम, मनोज लिंगायत, भाग्येश खरे, दीपक वैद्य, विजय होलम यांनी केले.