
राजस्थानमधील चुरू जिह्यात आज दुपारी हिंदुस्थानी हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी जग्वार विमान कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. मागील चार महिन्यांत हवाई दलाची विमाने कोसळण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
नियमित प्रशिक्षण सुरू असताना भानोदा गावातील एका शेतात हे विमान कोसळले. यात दोन्ही वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला. हवाई दलाने या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे.
‘जग्वार’चा इतिहास
जग्वार हे विमान गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून हिंदुस्थानी हवाई दलात आहे. ‘जग्वार’ची निर्मिती 1960 च्या दशकात झाली होती. दोन इंजिन असलेले हे सुपरसॉनिक विमान आहे. एकेकाळी ‘जग्वार’ विमाने ही भारतीय हवाई दलाची ताकद होती. आता अपघातांमुळे त्याच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
अपघातांची मालिका सुरूच
मागील आठ महिन्यांत आतापर्यंत हवाई दलाच्या पाच विमानांना अपघात झाला आहे. त्यात तीन जग्वार विमाने आहेत. एप्रिल 2025 मध्ये जामनगर येथे हवाई दलाचे जग्वार कोसळले होते. त्यात एका पायलटचा मृत्यू झाला होता, तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. मार्च 2025 मध्ये हरयाणातील पंचकुला येथे जग्वार कोसळले होते. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात मध्य प्रदेशात शिवपुरीजवळ मिराज 2000 कोसळले होते, तर नोव्हेंबर 2024 मध्ये तांत्रिक बिघाडामुळे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मिग-29 हे लढाऊ विमान कोसळले होते.