
गुजरातमधील वडोदरा जिह्यातील महिसागर नदीवरील गंभीरा पूल कोसळून आज 13 जणांचा मृत्यू झाला, तर 9 जखमी झाले. या अपघातात दोन ट्रकसह पाच गाडय़ा वाहून गेल्या. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली नसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. हा अपघात ’अॅक्ट ऑफ गॉड’ आहे की ’अॅक्ट ऑफ फ्रॉड’ आहे, असा सवाल विरोधकांनी केला आहे.
पूल कोसळल्याच्या घटनेनंतर काँग्रेसने भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ’जिह्यातील लोक सातत्याने या पुलाविषयी तक्रारी करत होते. हा पूल हलत असून तो पडू शकतो. वेळीच याकडे लक्ष द्या, अशी मागणी लोक करत होते. अपघाताआधी या पुलावर प्रचंड पैसा खर्च करण्यात आला होता. तरीही तो पडला, असा आरोप काँग्रेसने केला. तृणमूल काँग्रेसने थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. दोन वर्षांपूर्वी गुजरातमधील मोरबी पूल कोसळून मोठा अपघात झाला होता. आता पुन्हा तेच घडले आहे. हे ’अॅक्ट ऑफ गॉड’ आहे की ’अॅक्ट ऑफ फ्रॉड’ आहे, याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे. पण ते उत्तर देणार नाहीत, कारण ते विदेश फिरण्यात आणि पीआर स्टंट करण्यात बिझी आहेत, असा टोला तृणमूलने हाणला.