म्हाडाला हिरकणी कक्षासाठी जागा मिळेना! दहा महिन्यांत 15 कक्ष उभारले, 35 ठिकाणी अद्याप एनओसी नाही

म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून उपनगरात सार्वजनिक ठिकाणी 50 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. मात्र गेल्या दहा महिन्यांत केवळ 15 हिरकणी कक्ष उभारण्यात आले असून 35 ठिकाणी संबंधित प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळालेले नसल्यामुळे काम रखडले आहे.

सार्वजनिक ठिकाणी आपल्या बाळाला स्तनपान करताना महिलांची मोठी गैरसोय होते. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून मुंबई उपनगरात 50 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सप्टेंबर 2024 मध्ये कार्यादेश दिले आहेत.

हिरकणी कक्षासाठी जागा मिळावी म्हणून म्हाडाकडून सरकारी कार्यालये, रुग्णालय, पोलीस स्टेशनला पत्र पाठवण्यात आले होते. त्यानुसार 10 ठिकाणी कामे पूर्ण झाली असून 5 ठिकाणची कामे प्रगतिपथावर आहेत. उर्वरित 35 हिरकणी कक्ष उभारण्याकरिता जागा मिळावी यासाठी सार्वजनिक कार्यालये व रुग्णालये, सार्वजनिक उद्याने यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे, मात्र संबंधित आस्थापनांकडून अद्याप ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे हिरकणी कक्ष उभारण्याचे काम रखडले आहे, अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱयाने दिली.

एनओसी मिळताच कक्षाचे काम सुरू करू

संबंधित आस्थापनांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळावे यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. ना हरकत प्रमाणपत्र मिळताच उर्वरित हिरकणी कक्षाची उभारणी केली जाईल, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.