
अफगाणी महिला व मुलींवर अनन्वित अत्याचार केल्याप्रकरणी तालिबानचा सर्वेच्च नेता हिबतुल्लाह अखुंदजादा व अफगाणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अब्दुल हकीम हक्कानी यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (आयसीसी) हे वॉरंट बजावले आहे. ’मानवतेविरुद्धचे गुन्हेगार’ असा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे.
कट्टर धार्मिक संघटना असलेल्या तालिबानने 2021 मध्ये अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतली. तेव्हापासून तेथे अनेक महिलाविरोधी कायदे लागू करण्यात आले. एलजीबीटीक्यू समुदाय तालिबानचे मुख्य लक्ष्य ठरला. बलात्कार, खून, जेलमध्ये डांबणे, बेपत्ता करणे अशा प्रकारे मुली व महिलांचा छळ करण्यात आला. आयसीसीचे वकील करीम खान यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याविषयी आवाज उठवला होता.