
इराण-इस्रायल युद्धात उडी घेऊन इराणमधील अणुप्रकल्पांना लक्ष्य करणाऱया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता इराणच्या टार्गेटवर आहेत. ट्रम्प यांच्यावर कोणत्याही क्षणी ड्रोन हल्ला होऊ शकतो. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांच्या विश्वासू सल्लागाराने तशी धमकीच दिली आहे. त्यामुळे अमेरिका सावध झाली असून ट्रम्प यांची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात
आली आहे.
इराण इंटरनॅशनलने यासंदर्भात वृत्त दिले आहे. खामेनी यांचे विश्वासू सल्लागार जावेद लारीजानी यांनी एका टीव्ही मुलाखतीत ट्रम्प यांना ही धमकी दिली. ‘ट्रम्प स्वतःच्या कर्माने संकट ओढवून घेतले आहे. त्यांच्यावर ड्रोन हल्ला करणे कठीण नाही. ‘मारा-ए-लागो’मध्ये ‘सनबाथ’ घेत असताना एखादा छोटा ड्रोन कधीही ट्रम्प यांच्यावर आदळू शकतो, असे लारीजानी म्हणाले. ‘मार-ए-लागो’ हे ट्रम्प यांचे रिसॉर्ट आहे. ट्रम्प स्वतःच्या घरातही सुरक्षित नाहीत, हेच लारीजानीच्या धमकीतून स्पष्ट झाले आहे.
क्राऊड फंडिंग सुरू
‘ब्लड पॅक्ट’ (फारसीमध्ये ‘अहदे खून’) नावाच्या ऑनलाइन क्राऊड फंडिंग साईटने ट्रम्प यांच्यावर इनाम जाहीर केले आहे. इराणचे नेते खामेनी यांची थट्टा करणाऱया किंवा त्यांना धमकावणाऱयांचा बदला घेण्यासाठी ‘ब्लड पॅक्ट’ची सुरू करण्यात आली आहे. या साईटने 7 जुलैच्या संध्याकाळपर्यंत 20 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त निधी उभारला असून एपूण रक्कम 27 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. ट्रम्पच्या हत्येसाठी 100 दशलक्ष डॉलर्स गोळय़ा करण्याचे उद्दिष्ट आहे.