Health Tips – आहारात ‘या’ प्रमुख पीठांचा समावेश करा आणि निरोगी राहा!

निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात सर्व पौष्टीक घटकांचा समावेश करणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याकडे घरामध्ये गव्हाच्या पिठापासून चपात्या बनवल्या जातात. परंतु उन्हाळ्यात स्वतःला हलके आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल, तर गव्हाऐवजी इतर पिठाचा वापर करायला हवा. अशाच काही पीठांबद्दल आणि त्यांच्या गुणांबद्दल जाणून घेऊया.

नाचणीचे पीठ: नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असून , ते हाडांसाठी फायदेशीर असते. या पीठामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच वजन कमी करण्यास देखील मदत मिळते. यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया निरोगी ठेवते आणि साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करते.

 

 

बेसन: बेसनामध्ये भरपूर प्रथिने असतात, म्हणून बेसनाची भाकरी खाल्ल्याने शरीराला चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळतात. हे शरीराला शक्ती देते आणि पोट बराच काळ भरलेले ठेवण्यास मदत करते. बेसन खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाची जळजळही कमी होते.

Healthy Fruits- या 5 कारणांसाठी किवी हे फळ खायलाच हवे, वाचा

हरभरा, नाचणी आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या भाकऱ्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यांचे सेवन केल्याने आपले  पोट तर भरतेच, शिवाय आरोग्यही चांगले राहते. मुख्य म्हणजे या पीठामुळे आपल्या शरीराला जडत्वही येत नाही.

ज्वारीचे पीठ: ज्वारीची भाकरी सर्वोत्तम मानली जाते कारण ती शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवते. यामध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असतात, जे शरीरातील चयापचय सुधारण्यास मदत करतात. ज्वारीची भाकरी खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते.

जवाचे पीठ:  गव्हाऐवजी जवाच्या पिठाची भाकरी खाऊ शकता. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते थंडावा देणारे धान्य आहे, म्हणूनच फायदेशीर मानले जाते.

तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीची ऍलर्जी असेल किंवा तुम्ही कोणत्याही आजारावर उपचार घेत असाल, तर काहीही नवीन सुरू करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.