
गोवा राज्यात रॉटविलर आणि पिटबुल या हिंस्र स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या कुत्र्यांच्या जाती पाळण्यावर राज्य सरकार बंदी घालणार आहे. यासंदर्भातील विधेयक राज्य विधानसभेच्या आगामी अधिवेशनात मांडण्यात येणार असून त्याला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. मंत्रिमंडळाने गोवा प्राणी प्रजनन आणि पाळीव प्राणी (नियमन व नुकसानभरपाई) विधेयक, 2025 यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भात पशुवैद्यकीय पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर म्हणाले, ‘‘रॉटविलर आणि पिटबुल या जाती अनेकदा हल्लेखोर व नियंत्रणाबाहेर जातात. त्यांच्याकडून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही गंभीर इजा होण्याचा धोका असतो.त्यामुळे हे श्वान घरात पाळण्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर संबंधित जातींचे पाळीव प्राणी घरात ठेवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.’’
फेब्रुवारीमध्ये कुत्र्यांचे हल्ले वाढल्यानंतर लोकांनी हिंसक श्वानांच्या जातींवर बंदीची मागणी केली. लोकांची मागणी लक्षात घेऊन सरकारने या विधेयकाचा विचार केला. यसंबंधीच्या गोवा पशु प्रजनन कायद्यात अधिक संशोधनाची गरज व्यक्त करण्यात आली होती.
l पिटबुल, रॉटविलर यांसारख्या हिंसक श्वानांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने हा निर्णय घेतला आहे. नव्या कायद्यानुसार, ज्यांच्याकडे आधीपासून असे हिंसक कुत्रे आहेत, त्यांना कुत्र्यांची नसबंदी करून घ्यावी लागेल. तसेच पशुपालन विभागात नोंदणी करावी लागले. जे नियमाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.