
भांडुपच्या कोकण महोत्सवात भाजप खासदार नारायण राणे यांनी केवळ बदनामीच्या हेतूने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याबाबत बेताल विधाने केली होती. त्यामुळे राणे यांनी नोटिशीला दिलेले आव्हान तथ्यहीन असून त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद संजय राऊत यांच्यावतीने आज सत्र न्यायालयात करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालय बुधवार, 16 जुलै रोजी निकाल देणार आहे.
सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर या अर्जावर आज सुनावणी झाली. तेव्हा राणे यांच्या अर्जाला अॅड. सार्थक शेट्टी, अॅड. प्रकाश शेट्टी यांनी जोरदार विरोध केला. राणे यांचा हेतू संजय राऊत यांची प्रतिमा मलीन करण्याचा होता. राणे यांनी राऊत यांची बदनामी केली असून त्यांचा आव्हान अर्ज फेटाळून लावण्यात यावा, अशी मागणी अॅड. शेट्टी यांनी केली. तर राणे यांच्या वतीने अॅड. सतीश मानेशिंदे यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला. हा निकाल 16 जुलै रोजी दिला जाणार आहे.
असे आहे प्रकरण
भांडुप येथे 15 जानेवारी 2023 रोजी कोकण महोत्सवात जाऊन नारायण राणे हे संजय राऊत यांच्याविषयी बरळले होते. संजय राऊत यांना मी खासदार बनवले, त्यानंतर पैसे दिले असे बेताल वक्तव्य राणे यांनी केले होते. या प्रकरणी मानहानीचा खटला दाखल करण्यात आल्यानंतर माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने 23 एप्रिल 2025 रोजी नारायण राणे यांना नोटीस बजावली होती. दंडाधिकारी न्यायालयाच्या या नोटिशीला राणे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.