अधिवेशन संपण्याआधी कांजूरच्या डंपिंग ग्राऊंडसाठी पर्यायी जागा देणार, सुनील राऊत यांच्या मागणीला यश

कांजूरमार्ग येथील डंपिंग ग्राऊंडमुळे आसपासच्या परिसरात असह्य दुर्गंधी पसरून नागरिक हैराण झाले आहेत. त्या डंपिंग ग्राऊंडसाठी पर्यायी जागा शोधण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार डंपिंगसाठी पर्यायी जागा कधी देणार असा जाब आज शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी विधानसभेत सरकारला विचारला.

कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडसंदर्भात आमदार मिहिर कोटेचा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेत भाग घेताना आमदार सुनील राऊत यांनी, यापूर्वी आठ ते नऊ वेळा आपण सभागृहात कांजूरच्या डंपिंग ग्राऊंडबाबत प्रश्न विचारूनही शासनाने त्याबाबत गांभीर्य दाखवले नसल्याचे सांगितले.

गेली अनेक वर्षे मुंबईतील कचरा कांजूरमध्ये डंप केला जातो. पण डंपिंगवेळी नियमानुसार जे व्यवस्थापन व्हायला पाहिजे ते होत नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरते. उच्च न्यायालयाने महापालिकेला तीन महिन्यांत पर्यायी जागेसाठी मुदत दिली आहे. ती जागा सरकार शोधणार का. कांजूरच्या डंपिंगसाठी महानगरपालिकेला 114 हेक्टर जागा पनवेल की अंबरनाथला दिलेली आहे, परंतु आपल्या माहितीनुसार अशी पुठलीही जागा दिलेली नाही, असे आमदार सुनील राऊत यांनी सभागृहात सांगितले. कांजूरला होणारे डंपिंग तत्काळ बंद करणार का आणि दुर्गंधी पसरू नये म्हणून सरकार काय उपाययोजना करणार असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

लवकरच बैठक 

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर उत्तर दिले. कांजूरच्या डंपिंगविरोधात स्थानिक रहिवासी आणि वनशक्ती संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने नगरविकास मंत्र्यांनी यासंदर्भात बैठक घेऊन डंपिंगसाठी पर्यायी जागा निवडावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेतली जाईल आणि पर्यायी जागा शोधण्याचे निर्देश दिले जातील. तसेच मुंबईतील कचऱ्यांसंदर्भातील सर्व समस्यांवर बैठक घेतली जाईल, असे आश्वासन सरकारच्या वतीने उदय सामंत यांनी दिले.