Ind Vs Eng – ऋषभने सामन्यात रोमांच भरला!

>> संजय कऱ्हाडे

लॉर्ड्सवर तिसऱ्या दिवशी खेळपट्टी अजगरासारखी सुस्तावलेली होती. वामकुक्षीच जणू! सगळं कसं एकदम शांत-शांत चाललं होतं. ऋषभ आणि राहुलची फलंदाजी आश्वासक वाटत होती. हिंदुस्थानची धावसंख्या 3 बाद 248. इंग्लंडच्या धावसंख्येच्या गळ्यात आपण आरामात हार घालणार असं वाटतच होतं की सामना रोमांचकारक करण्याचं ऋषभने ठरवलं. उपाहारासाठी फक्त तीन चेंडू बाकी असताना ऋषभने नसलेली धाव घ्यायचं नक्की केलं, तो धावला अन् धावचीतसुद्धा झाला! तोपर्यंत 98 धावांवर राहुल नाबाद होता आणि ऋषभ 74 धावांवर. म्हणे, एकेरी धाव घेऊन राहुलला त्याचं शतक लवकर पूर्ण करण्याची संधी देण्याचा त्याचा प्रयत्न होता! एकीकडे ज्यो रूट शतक पूर्ण करण्यासाठी 99 धावांवर एक अख्खी रात्र झोकून आलेला आम्ही पहिला आणि इथे राहुलच्या शतकासाठी ऋषभ जेवणभर थांबू शकत नव्हता. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना! कम्मालच म्हणायची!!

असो, राहुलने ऋषभबरोबर 141 धावांची भागीदारी नोंदवली आणि शुक्रवारी जेमी स्मिथचा झेल सोडून राहुलने जे पाप केलं होतं त्याचं क्षालनसुद्धा छान संयमी शतक फटकावून केलं. पण नंतर लगेच बादही झाला. अर्थात, मोठय़ा भागीदारीनंतर एकापाठी दुसराही फलंदाज बाद होतो हा क्रिकेटचा अलिखित नियम पुन्हा एकदा सिद्ध झाला.

इंग्लंड.चा कप्तान बेन स्टोक्स आतापर्यंत या मालिकेत वेळोवेळी महत्त्वाचे बळी मिळवत आलाय. त्याच्या हातातला चेंडू फलंदाजांसाठी जादुमयी ठरलाय. त्याच सोनेरी हाताने फेकलेला चेंडू ऋषभला धावचीत करून गेला होता. पण त्यातूनही जडेजा आणि नितीशकुमार काहीच शिकले नाहीत. सुरुवातीला दोघांनीही एकमेकांना धावांसाठी हाकारे देताना सामना आणखी चित्तथरारक करण्याचा मनापासून प्रयत्न केला. पण त्यांना धावचीत होण्यात अपयश आलं आणि नंतर मात्र त्यांनी संयम दाखवत चांगली भागीदारी केली. दरम्यान, चहापानापूर्वी स्टोक्सचाच एक उसळलेला चेंडू नितीशला लागला आणि नंतर त्यानेच नितीशला बाद केलं. सामन्यात आघाडी घेता-घेता पिछाडीवर पडण्याचा प्रश्न निर्माण झाला!

रोहित शर्मा एका जाहिरातीमध्ये म्हणतो, ‘हमारी टीम वहां सीखने नहीं, सिखाने जा रही हैं.’ सामना रोमांचकारी कसा करायचा हेच शिकवायला आपली टीम इंग्लंडला गेलेली नाही ना!