Pravin Gaikwad Attack – माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, हल्ल्याला पूर्णपणे सरकार जबाबदार – प्रवीण गायकवाड

माझ्यावर झालेला हल्ला हा माझ्या हत्येचा कटच होता. मात्र संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यामुळे मी वाचलो. या हल्ल्याला पूर्णपणे सरकार जबाबदार, असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले आहेत. आज प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट दौऱ्यावर असताना त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार घडला. तसंच कारमध्ये आणि रस्त्यावर त्यांना मारहाण झाल्याचंही सांगण्यात येत आहे. हा प्रकार शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा संशय आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण गायकवाड म्हणाले की, “माझ्यावर हल्ला करणारे भाजपचेच कार्यकर्ते असून ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावानं काम करतात. माझ्यावर झालेल्या हल्ल्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. पण माझ्यावर हल्ला करणारे आणि घडवून आणणाऱ्यांना सांगतो की, ही शेवटाची सुरुवात आहे.”

यावेळी बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले आहेत की, “पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते असुरक्षित असून, पानसरे, कलबुर्गी, दाभोळकर, गौरी लंकेश यांच्या खुनांचा संदर्भ त्यांनी दिला.” पोलिस यंत्रणा जाणीवपूर्वक घटनास्थळी नव्हती का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या घटनेचा निषेध केला आहे. यावर X वर एक पोस्ट करत आमदार रोहित पवार म्हणाले आहेत की, “बहुजन समाजात अनेक उद्योगपती घडवणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करणाऱ्या विकृतीचा जाहीर निषेध. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार समाजात रुजवण्याचं खूप मोठं कार्य प्रविणदादा गायकवाड यांच्या हातून होत आहे. अभ्यासाच्या बळावर त्यांनी अनेकांना उघडं पाडण्याचं काम केलं, म्हणून तर समाजकंटकांनी त्यांच्याशी अशा प्रकारे गैरकृत्य केलं नाही ना? याचाही तपास झाला पाहिजे. तसंच हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाशी आणि विचारांशी संबंधित आहे, हे उघड आहे. त्यामुळं या भ्याड कृत्यामागील मास्टरमाईंडचाही पोलिसांनी शोध घ्यावा.”