
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामीळनाडूतील जिंजी किल्ला अशा एकूण 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा ‘युनेस्को’ने बहाल केला. भाजप याचा राजकीय विजय उत्सव साजरा करीत आहे. तसा तो जरूर साजरा करा. भाजपचा जन्म अशा ‘उत्सवा’साठीच आहे, पण हा जागतिक वारसा तुम्हाला पेलवेल ना?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी ही अभिमानाची बाब आहे. महाराजांनी महाल, राजवाडे बांधले नाहीत. स्वराज्य रक्षणासाठी किल्ले बांधले. हे किल्ले म्हणजेच स्वराज्याची संपदा होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीत गडकिल्ल्यांचे महत्त्व अभेद्य आहे. छत्रपतींनी राज्याभिषेक करून घेतला तो रायगड किल्ल्यावर आणि राजधानीसुद्धा ठेवली ती किल्ले रायगड. शिवाजी महाराजांच्या जीवनात, संघर्षात किल्ल्यांचे महत्त्व हे असे होते. भारतातील राज्यकर्त्यांनी या किल्ल्यांवर सोहळे साजरे केले, पण हा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी दिल्ली किंवा महाराष्ट्राने विशेष प्रयत्न केले नाहीत. आता महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोकडून ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ म्हणून मानांकन मिळाले म्हणून भारतीय जनता पक्षाने जल्लोष कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. 106 ठिकाणी शिवआरती करण्याची घोषणा भाजपच्या मंत्र्यांनी केली. एखाद्या गोष्टीचे श्रेय घ्यायचे व त्याचे राजकीय उत्सव लगेच साजरे करायचे यात भाजपचा हात कोणी धरणार नाही. यासाठी विभागवार शक्तिप्रदर्शन, ढोल पथके, पोवाड्यांचे कार्यक्रम केले जातील. जणू शिवरायांचे स्वराज्य, त्यांची दुर्गसंपदा ही भाजपमुळेच निर्माण झाल्याचे यापुढे सांगितले जाईल. शिवाजीराजे म्हणजे महाराष्ट्राचे मानदंड आहेत. त्यांच्या पराक्रमाची गाथा अनेक चरित्रकारांनी आजवर गायिलेली आहे आणि पुढेही गातील. न्यायमूर्ती रानडे यांनी ‘मराठी राष्ट्राची निर्मिती’ ही शिवाजीराजांची थोर देशसेवा असा सिद्धांत मांडला. छत्रपतींनी फक्त राज्य स्थापन केले नाही, तर
मराठी राज्य
आर्थिकदृष्टय़ा कसे सबल होईल यासाठी काम केले. आज शिवरायांच्या महाराष्ट्रावर साधारण नऊ लाख कोटींचे कर्ज आहे. शिवरायांनी मराठी राज्य निर्माण केले व संरक्षणासाठी किल्ले उभारले. त्यामुळे त्या काळात पठाणकोट, पुलवामा, पहलगामसारखे हल्ले महाराष्ट्रावर होऊ शकले नाहीत. पहलगामचे अतिरेकी पळून गेले तसे महाराजांनी अफझलखान वगैरेंना पळून जाऊ दिले नाही. शाहिस्तेखानाची तर लाल महालात बोटेच छाटली. मराठय़ांचे राज्य म्हणजे लुटारूंचे राज्य अथवा लष्करी राजवट अथवा सरंजामशाही नव्हती. ते ‘बहुत जनांसी आधारू’ असे लोकांचे राज्य होते. त्या राज्याच्या राजमुद्रेत ‘भद्राय राजते’ अशी अक्षरे होती. आज शिवरायांच्या नावाने जल्लोष करणाऱयांचे महाराष्ट्रातले राज्य हे लुटारूंचे राज्य झाले आहे. लुटमारीस खुली सूट दिली आहे व हे लोक शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाला म्हणून जल्लोष, शिवआरती वगैरे करत आहेत. मराठी भाषा ही शिवाजी महाराज व त्यांच्या मावळय़ांची आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला, पण महाराष्ट्रातच मराठी भाषा आणि मराठी माणसाचा सन्मान राहिलेला नाही. शिवरायांची भाषा जतन केली जात नाही. त्यासाठी आजही संघर्षाच्या ठिणग्या उडत आहेत व आता किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळाल्यावर भाजपवाले टणाटणा उडय़ा मारू लागले. काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवरायांची भवानी तलवार ब्रिटिश म्युझियममधून आणली व निवडणुकीपूर्वी या मंडळींनी त्या तलवारीची राजकीय यात्रा काढली. त्या तलवारीचे पुढे काय झाले? आता ती तलवार कोठे आहे? मुळात ही तलवार सरकार दावा करते त्याप्रमाणे भवानी तलवार नाही. राज्य
सरकार शिवप्रेमींच्या भावनांशी
खेळत आहे असे इतिहास तज्ञ सांगतात, तरीही भाजपवाल्यांनी तलवारीचेही राजकारण केलेच. आता त्यांनी नागपूरच्या राजे मुधोजी यांची तलवार आणायची घोषणा केली. इतिहासाची मालकी आपल्याकडेच आहे असे सांगण्याचा भाजपचा हा प्रयत्न गमतीशीर आहे. मात्र अंदर की बात अशी की, जागतिक वारसा लाभलेल्या या 12 किल्ल्यांचे संवर्धन सरकारने केले नाही तर युनेस्को जागतिक वारशाचे हे मानांकन काढून घेईल. तसा नियमच आहे. सन 2012 मध्ये ‘पश्चिम घाट’ जागतिक वारसा म्हणजेच World Heritage म्हणून युनेस्कोने घोषित केले. पश्चिम घाट हासुद्धा एक ऐतिहासिक वारसा आहे. पश्चिम घाट परिसरातील जैवविविधतेला धक्का पोहोचेल असे कोणतेही बांधकाम होता कामा नये असे ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ वारंवार सांगत राहिले. तसा एक अहवालच आहे. अशा पश्चिम घाटाला जागतिक वारसा म्हणून मानांकन मिळाले होते तेव्हा त्यात त्या परिसरातील सर्वच गडकिल्लेसुद्धा समाविष्ट होते. मात्र आज त्या पश्चिम घाटावर अमानुषपणे हातोडे, बुलडोझर, जेसीबी चालवले जात आहेत. अलमट्टी धरणाची उंची वाढवणे असो की शक्तिपीठ महामार्गाची जबरदस्ती, या World Heritage वरच हातोडे चालतील व युनेस्कोने ज्याचे संवर्धन करण्याचा संदेश दिला तेच नष्ट केले जाईल. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामीळनाडूतील जिंजी किल्ला अशा एकूण 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा ‘युनेस्को’ने बहाल केला. भाजप याचा राजकीय विजय उत्सव साजरा करीत आहे. तसा तो जरूर साजरा करा. भाजपचा जन्म अशा ‘उत्सवा’साठीच आहे, पण हा जागतिक वारसा तुम्हाला पेलवेल ना?