
शनिशिंगणापूर देवस्थानच्या बहुचर्चित बनावटऍपद्वारे ऑनलाइन व्हीआयपी दर्शनपूजा, अभिषेक व तेल चढावा, यामध्ये भाविकांची फसवणूकप्रकरणी शनेश्वर देवस्थानने फिर्याद देण्यास टाळाटाळ केल्याचे पोलिसांनी फिर्यादीत म्हटले असून, अखेर दीड महिन्यानंतर सायबर पोलिसांनी स्वतः फिर्याद देऊन पाच बनावट अॅप अज्ञातधारक मालक व अज्ञात साथीदारांविरोधात शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सायबर पोलीस अहिल्यानगर सुदाम काकासाहेब काकडे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पूजा परिसेवा, घर मंदिर, हरी ओम, ऑनलाइन प्रसाद, ई-पूजा या ऍप अज्ञातधारक मालक व साथीदारांनी शनेश्वर देवस्थान व धर्मदाय आयुक्त यांची ऑनलाइन व्हीआयपी दर्शन पूजा अभिषेक व तेल चढावा बुकिंगकरिता कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नाही.
शनेश्वर देवस्थानला देणगी न देता सदर युआरएल संकेतस्थळ अज्ञातधारक मालक यांनी त्यांच्या साथीदारासह शनिशिंगणापूर येथील शनिमहाराजांच्या शिळेचा फोटो, शनी मंदिराचा व महाद्वाराचा फोटो वापरून तसेच संकेतस्थळधारक मालक यांचे कोणतेही अधिकृत पुजारी शिंगणापुरात उपलब्ध नसताना, त्यांनी त्यांच्या पुजाऱ्यांमार्फत शनिदेवाची पूजा, अभिषेक व तेल चढावा केला जाईल, असा खोटा मजकूर फसवणुकीच्या उद्देशाने संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन प्रसारित केला आहे.
अज्ञात आरोपींनी ऑनलाइन पद्धतीने भाविकांकडून अनियमित दराने स्वतःच्या फायद्यासाठी रकमा स्वीकारल्या. शनेश्वर देवस्थान व भाविकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत शनेश्वर देवस्थानचे सुरक्षा अधिकारी गोरख भीमाशंकर दरंदले व देवस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ केरू दरंदले यांना कळूनही देवस्थानने अज्ञात साथीदार व आरोपी यांच्याविरोधात फिर्याद देण्यास टाळाटाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. देवस्थानने जेणेकरून शनिशिंगणापूर पोलीस ठाणे अगर कोणत्याही पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद न दिल्याने सदर प्रकरणाचे संवेदनशील व भाविकांच्या भावनांशी संबंधित असल्याने भाविकांची व संस्थांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी फिर्यादी यांना शनेश्वर देवस्थान संबंधात वरील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शनिवार (दि. 12) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेदाम सायबर पोलीस अहिल्यानगर करत आहेत.
अधिवेशनात प्रश्न उपस्थित होताच कारवाई
शनिशिंगणापूर देवस्थानचा भ्रष्टाचार, कथित ऍप ऑनलाइन घोटाळय़ाबाबत शुक्रवार (दि. 11) विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले. अहिल्यानगरच्या सायबर पोलिसांनी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे दीड महिन्यानंतर बनावट अॅप विरोधात गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवली. दरम्यान, सायबर पोलिसांना अजूनही आरोपी निष्पन्न झाले नसून, त्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.