Home Remedies – पावसाळ्यात वरचेवर होणाऱ्या पित्ताच्या त्रासावर हे आहेत हमखास घरगुती उपाय, वाचा

पावसाळ्यात आपली पचनशक्ती फार मोठ्या प्रमाणात मंदावते. पावसाळ्यात पचनाचे प्राॅब्लेम्स वारंवार डोकं वर काढत असतात. मुख्य म्हणजे केवळ पचनच नाही तर, पावसाळ्यात आपल्याला पित्ताच्या त्रासालाही फार मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं. वरचेवर होणाऱ्या पित्तावर आपण काही घरगुती उपाय करणं हे खूप गरजेचं आहे.

केवळ इतकेच नाही तर, पित्त होण्याची कारणे ही खूप आहेत. धावत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा सतत चुकतात. कामासाठी तासनतास बाहेर राहावे लागत असल्याने बाहेरचे अन्नपदार्थ, फास्टफुड आपण खातो. तसेच अपूर्ण झोप, बिघडलेल्या दिनक्रमाचा सगळ्यात जास्त पोटावर परिणाम होत असतो. यातूनच मग पित्त, अॅसिडिडी, गॅसेस होणं यांसारख्या गोष्टी वारंवार जवळपास सगळ्यांच्याच बाबतीत होतात. वारंवार गॅस होण्यामुळे अनेकदा आपल्याला नकोसे होते. यावरच आपण पाहणार आहोत काही खास घरगुती टिप्स.

आपल्या मसाल्याच्या डब्यातील ओवा केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी नाही तर, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात ओवा हा असतोच. तुम्हाला जर पोटात मुरडा आल्यासारखे वाटत असेल तर हातावर ओवा थोडा रगडून तुम्हाला तो खायचा आहे. ओव्याचा वास आणि दाताखाली आलेल्या ओव्याच्या रसामुळे तुम्हाला छान आराम मिळेल. ओवा ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या सोबत सहज कुठेही जाताना बाळगू शकता.

बडिशेपचे पाणी हे देखील पित्तावर रामबाण उपाय मानले जाते. बडिशेपचे पाणी आपण नियमितपणे पिल्यामुळे, आपल्या शरीरातील पित्ताची मात्रा कमी होण्यास मदत होते. बडिशेप रात्रभर भिजवून ते पाणी सकाळी पिऊ शकतो. किंवा बडिशेप पाण्यात उकळवून ते पाणी आपण पिऊ शकतो.

पित्तावर रामबाण उपाय म्हणून आवळा हा उत्तम मानला जातो. आवळ्याचे सरबत किंवा आवळ्याचा रस हा पित्तासाठी खूप उत्तम मानला जातो. म्हणूनच पित्ताचा त्रास वरचेवर होत असल्यास, आवळा सुपारी खाणे सुद्धा उत्तम मानले जाते.

रात्री झोपण्याआधी किमान दोन ते तीन तास आधी जेवावे. यामुळे पित्ताचा त्रास हा मोठ्या प्रमाणात कमी होतो. तसेच रात्रीच्या जेवणानंतर चालणे हे हितावह मानले जाते.

अपचनावर गुळ हाही एक उत्तम पर्याय मानला जातो. अलिकडे आपल्या बदललेल्या जेवणाच्या वेळांमुळे अपचन आणि पित्त फार मोठ्या प्रमाणात होते. अशावेळी गुळाचा एक खडाही फार उपयुक्त आहे. पूर्वीच्या काळी लोक जेवल्यानंतर शतपावली करायचे. मात्र आता लोकांकडे वेळच नसल्याने घरी गेल्यावर जेवून कधी झोपतो असं होतं. दररोज जेवणानंतर गुळ खाल्ल्याने अन्न पचनास आणि परिणामी संबंधित त्रासातून सुटका होण्यास मदत होते. गुळ तोंडात विरघळेपर्यंत चघळत राहावा ही प्रक्रिया जेवढी हळू होईल तेवढा त्याचा फायदा जास्त होईल.

बऱ्याचवेळा पोटाच्या विकारांसाठी काळा चहा लिंबू पिळून घेतला जातो. त्यामुळे निश्चित फरक पडतो, मात्र जर चहात लिंबासोबत आलेदेखील टाकल्यास त्याचा अधिक लाभ होतो. त्याच बरोबर तुम्ही नुसते आल्याचे तुकडे चोथा होईपर्यंत चघळले, त्याचा रस प्यायल्यास आणि त्यावर जर तुम्ही थोडे कोमट पाणी प्यायलात तर तुम्हाला आराम मिळू शकेल. यातून बद्धकोष्टतेचा त्रास देखील कमी होतो.

Weight Gaining Food – खूप बारीक आहात का? मग हे दोन पदार्थ एकत्र खा, वजन वाढेल आणि दिसालही सुंदर