
शनिवार, रविवार सुट्टीच्या मुहूर्तावर आज निसर्गरम्य माथेरानमध्ये पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक ‘हौस’ फुल्ल गर्दी उसळली. ठाणे जिल्ह्यासह राज्यातल्या विविध भागांतून सुमारे २५ हजारांहून अधिक पर्यटक कुटुंबकबिल्यासह येथील हिरवाईचा आनंद लुटण्यासाठी आले खरे. पण अनेकांना घाटातील वाहतूककोंडीचा फटका बसला. त्यामुळे परतीचा प्रवास करण्यासाठी दस्तुरी नाका ते वॉटरपाइपपर्यंत साडेतीन किलोमीटरची पायपीट करावी लागली.
पावसाळ्यात माथेरानचे सौंदर्य अनेकांना भुरळ घालते. रिमझिम पाऊस.. दाट धुके आणि वाफाळलेला गरमागरम चहा तसेच भजी याचा आस्वाद घेण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच पर्यटक माथेरानमध्ये आले होते. येथील वेगवेगळे पॉइंट्स बघितल्यानंतर पर्यटकांना घरी जाण्याचे वेध लागले. पण वाहतूककोंडीमुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
नेरळ स्थानकापर्यंत तंगडतोड
गेल्या काही दिवसांपासून घाटामध्ये लहान मोठे अपघात होत असून वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. आजही झालेल्या कोंडीमुळे दस्तुरी नाक्यापासून वॉटरपाइपपर्यंत चालत जाऊन मिळेल त्या वाहनाने नेरळ स्टेशन पर्यटकांनी गाठले. काहींना तर वाहन न मिळाल्याने नेरळपर्यंत तंगडतोड करावी लागली.