ठसा – डॉ. सतीश नाईक

>>  श्रीकांत आंब्रे

जगण्यासाठी आम्ही

बरंच काही केलं

आणि बरंच काही करताना

जगायचंच राहून गेलं

डॉ. सतीश नाईक यांच्या कवितेतील या ओळी. आपल्या डॉक्टरकी इतकेच साहित्य, संगीत आणि इतर विविध कलांवर मनस्वी प्रेम करणारे डॉ. सतीश नाईक यांचे अकाली नुकतेच झालेले निधन त्यांच्या चाहत्यांना धक्का देणारे आहे. अनेक पत्रकारांचे मित्र असलेले डायबेटॉलॉजिस्ट अशी त्यांची ओळख असली तरी त्यापलिकडे एक अत्यंत भावनाशील, प्रेमळ आणि सहृदयी माणूस अशी त्यांची असलेली प्रतिमा त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यांसमोरून कधीच जाणार नाही. मधुमेह तज्ञ म्हणून ते जितके ओळखले जात तितकेच एक प्रतिभावान लेखक, कवी म्हणून ते परिचित होते. आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदांना निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्यासाठी त्यांनी अनेक परदेश दौरे केले. तिथे लाभलेल्या मधुमेहाच्या अद्ययावत ज्ञानामुळे रुग्णांना भरपूर दिलासा मिळत असे.

दै. ‘सामना’ तसेच ‘मार्मिक’ साप्ताहिकात त्यांनी वैद्यकीय विषयांवर विपुल लेखन केले, पण त्यांचा खऱ्या अर्थान जीव रमत असे तो ललित लेखनात. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या ‘चकरक चकरक’ या चटकदार कादंबरीतील एकेक अनुभव जसे प्रत्ययकारी आहेत तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन त्यांनी लिहिलेले ‘एका वाघाची गोष्ट’ हे छोटेखानी चरित्रही लक्षवेधक आहे. त्याशिवाय ‘सत्कार गुच्छ,’ ‘ताणतणाव,’ ‘कधीतरी कुठेतरी’ हा चारोळी संग्रह,‘डायाबिटीज और रमजान’ (हिंदी), ‘श्री सिद्धीविनायक मंदिर’ (गुजराती), ‘हृदयाची गोष्ट’ ही पुस्तकेही त्यांच्या विविधांगी लेखन सामर्थ्याचे दर्शन घडविणारी आहेत. तरीही त्यांच्यातील अनेक गुणवैशिष्टय़ांची खरी ओळख पटते ती त्यांच्या ‘कधीतरी कुठेतरी’ या चारोळी संग्रहातूनच. त्यांची जीवनदृष्टी, मिश्कील विनोदी वृत्ती, सामाजिक, राजकीय भान आणि नितळ सौंदर्यस्पर्शी प्रेमानुभवातील हळवेपण याचा प्रत्यय या संग्रहातून येतो. या संग्रहात काही चारोळ्या, काही विडंबनं तर काही दारूवरच्या ‘दारोळ्या’ आहेत. कोणीही मद्यप्रेमी त्यांना दाद दिल्याशिवाय राहणार नाही. उदा. ‘आनंदच घ्यायचाय तर थोडा कशाला? प्या की तशीच त्यात सोडा कशाला?’ ‘लिव्हर सलामत तो पेग पचास.’ प्रेम आणि वास्तव जीवनाचे तत्त्वज्ञानही ते अचूक सांगतात.

 ‘दवासारखं प्रेम केलं, उन्हं येताच उडून गेलं,’ ‘श्रावणसर यावी, तशी तुझी आठवण आली, डोळ्यात कायमचा, पूर ठेवून गेली,’ ‘उगाच मी या चंद्राला, रात्र रात्र जागवलं,  चिमूटभर दुःख माझं, डोंगराएवढं वागवलं’ ‘शहरंच्या शहरं जाळताना, विचार करावा लोकांनी, एकेक घर बनवायला, आयुष्य जाळलंय लोकांनी’ ‘आयुष्यभर मी स्वतःशीच झगडत राहिलो, ज्या वाटेने गेलो नाही, त्याचीच धूळ झटकत राहिलो’ डॉक्टरांच्या जीवनदृष्टीचा अर्क यात सापडतो. डॉक्टर खाद्यपदार्थांचे शौकीन होते. खाणे आणि खिलवणे या प्रमाणेच गाणे हा त्यांच्या आस्वादाचा भाग होता. गेल्या काही वर्षांत झालेल्या कौटुंबिक आघातातून ते शेवटपर्यंत सावरले नाहीत. निगर्वी स्वभाव, वागण्यातील साधेपणा आणि नम्रता, गप्पाष्टकांत मनमुराद रमणारे हे हसतमुख, लोभस व्यक्तिमत्त्व आपल्या आठवणी मागे ठेवून अचानक अनंतात विलीन झाले.