Ind Vs Eng – चित्तथरारक सामना!

>> संजय कऱ्हाडे

लॉर्ड्स कसोटी जिंकण्या-हरण्यातला फरक होता फक्त बावीस धावांचा. हृदयाचा ठोका चुकवणारा. गळय़ात आवंढा डकवणारा. तुझी हार माझी वाटवणारा. कुणालाच न हरवणारा, मात्र क्रिकेटला जिंकवणारा! कालचा पराभव मालिकेत आपल्याला पिछाडीवर ढकलणारा असेलही, पण लाजीरवाणा नव्हता. संघातल्या नावाजलेल्या फलंदाजांच्या चुका पदराआड घेणारा होता.

यशस्वी जयस्वालच्या मस्तवाल फटक्यामुळे दुसऱया डावाची घसरण सुरू झाली. हिंदुस्थानी फलंदाजांच्या डोक्यात संशयाचा जंतू त्याच्याच बाद होण्यामुळे जन्माला आला. करुण नायरने केवळ कार्सच्या आत येणाऱया चेंडूला नाही तर स्वतःच्या कारकीर्दीलाच वाऱ्यावर सोडून दिलं. शुभमन गिलसुद्धा त्याच्या मनात निर्माण झालेल्या शंकेच्या पालीमुळेच बाद झाला. ऋषभ आणि वॉशिंग्टनला मात्र आर्चरच्या जादुमयी गोलंदाजीने आणि अवाक् करून सोडणाऱया झेलने बाद केलं. आणि ही सगळी सोयरे मंडळी बाद होण्याचं दडपण राहुलला बाद करून गेलं.

अर्थात, कडक शाबासकीचा हक्कदार मात्र ठरला तो जाडेजा. तब्बल 181 चेंडूंत 61 धावांची नाबाद खेळी करताना त्याने जणू त्याचा सर्व मानमरातब पणाला लावला अन् विजय हिंदुस्थानच्या हातातोंडाशी आणून ठेवला. त्याला जिवाभावाची साथ मिळाली नितीशकुमार (53 चेंडू), बुमरा (54 चेंडू) आणि सिराज (30 चेंडू) यांची. आता जडेजाच्या साथीने या तिघांनी जी जिद्द, लढवय्या वृत्ती, हार न मानणारी मानसिकता दाखवली त्यातून इतर स्फूर्ती घेतील एवढीच माफक अपेक्षा.!

चौथ्या कसोटीत यशस्वीची सुधारित आवृत्ती पाहण्याची इच्छा आहे! अनावश्यक धोका पत्करून रिषभने धावण्याच्या शर्यतीत सहभागी होऊ नये अशी प्रार्थना आहे. क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या ज्या जवळपास साठ कोटी चाहत्यांनी शेवटच्या दिवशी हा सामना पाहिला त्या सर्वांनी पुढच्या कसोटीसाठीसुद्धा हजेरी लावावी अशी त्यांनाही विनंती आहे! आणि… चौथा कसोटी सामना खेळावा अशी बुमराचरणी याचना आहे!