शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? पुढच्या महिन्यात फैसला, सुप्रीम कोर्ट म्हणाले, हा विषयच निकाली काढायचाय!

supreme court

शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह कुणाचे? याचा अंतिम फैसला सर्वोच्च न्यायालय ऑगस्टमध्ये करणार आहे. शिंदे गटाला आगामी पालिका निवडणुकांमध्ये ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखा, यासाठी तातडीने सुनावणी घ्या, अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सोमवारी न्यायालयाला केली. ही विनंती मान्य करीत न्यायालयाने शिवसेनेच्या मूळ याचिकांवर ऑगस्टमध्ये सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली. आम्हाला हा विषय लवकर निकाली काढायचाय, असे न्यायमूर्ती सूर्य कांत म्हणाले. दरम्यान, न्यायालयाने 20 ऑगस्टला सुनावणी निश्चित केली असून दोन वर्षे रखडलेल्या या प्रकरणात ‘तारीख पे तारीख’चे सत्र थांबले आहे.

महाराष्ट्रातील महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अर्ज केला. त्यावर सोमवारी न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना कधीही जारी केली जाऊ शकते. त्यामुळे न्यायालयाने शिवसेनेच्या मूळ याचिकांवर लवकरात लवकर सुनावणी घेऊन निकाल द्यावा, अशी विनंती अॅड. कपिल सिब्बल यांनी केली. त्यावर मिंधे गटातर्फे अॅड. निरज किसन कौल यांनी आक्षेप घेतला. तथापि, न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी अॅड. सिब्बल यांची विनंती मान्य केली आणि आम्हाला हा विषय लवकर निकाली काढायचाय, असे स्पष्ट केले. त्यानंतर सायंकाळी मूळ याचिका आणि अंतरिम अर्जावर 20 ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे पालिका निवडणुकीआधीच मूळ शिवसेनेला ‘न्याय’ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिंधे गटाचे धाबे दणाणले आहे.

निवडणुका लगेच नाहीत; सरकारचा कोर्टात दावा

सुनावणी वेळी सरकारतर्फे अॅड. मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. महाराष्ट्रातील महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेच घेतल्या जाणार नाहीत, असे रोहतगी यांनी सरकारतर्फे न्यायालयाला कळवले. शिवसेनेतर्फे अॅड. सिब्बल यांनी पालिका निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर रोहतगी यांनी निवडणुका लगेच होणार नाहीत, काळजी करू नका, असा युक्तिवाद केला.

या याचिकांवर होणार सुनावणी

  • केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022मध्ये मिंधे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मुभा दिली होती. निवडणूक आयोगाचा तो निर्णय पक्षपाती आणि पूर्णपणे असंवैधानिक असल्याने रद्द करावा, अशी मागणी करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केली आहे. दोन वर्षे प्रलंबित राहिलेल्या त्या याचिकेवर अखेर अंतिम सुनावणी होणार आहे.
  • शिवसेनेशी गद्दारी केलेल्या मिंधे गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवणे आवश्यक होते. मात्र त्यांना पात्र ठरवले. 16 गद्दार आमदारांना अपात्र ठरवण्याची शिवसेनेची विनंती विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांनी 10 जानेवारी 2024 रोजी अमान्य केली. त्या निर्णयाला आव्हान देत शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे.

सुनावणी महत्त्वपूर्ण ठरेल, संविधानिक स्पष्टता येईल! – अॅड. असीम सरोदे

शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय तसेच गद्दार आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांनी अपात्र ठरवले नाही, या दोन्ही निर्णयांविरोधातील अपीलांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे. त्यामुळे ही सुनावणी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. केवळ महाराष्ट्रातील जनतेपुढे नव्हे तर विधी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व वकिलांपुढे संविधानिक स्पष्टता येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांनी दिली. याच वेळी त्यांनी घटनात्मक मुद्दय़ांचा अंतर्भाव असलेल्या प्रकरणांची मर्यादित कालावधीत सुनावणी झाली पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पद भूषवले. त्यांचा तो कालावधी असंविधानिक होता. अशा प्रकारांमुळे लोकशाहीची तूट निर्माण होते. ही तूट भरून काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पुढाकार घेतला आहे, असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान शिवसेनेतर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, तर अॅड. असीम सरोदे, अॅड. रवी अडसुरे, अॅड. रोहित शर्मा, अॅड. यश सोनावणे यांनी कायदेविषयक सहाय्य केले.

गद्दार आमदारांची ‘पात्रता’ कळणार

शिवसेनेशी गद्दारी केलेल्या मिंधे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या त्या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. त्या अपीलावरही न्यायालय सुनावणी घेणार आहे. त्यामुळे मिंधे गटाचे आमदार पात्र होते की अपात्र? याचाही अंतिम निर्णय लवकरच जाहीर होणार आहे.

न्यायालय म्हणाले…

निवडणुका येतील-जातील आणि तुम्ही निवडणुका लढवत राहाल. आम्हाला या प्रकरणात सर्वात आधी मूळ याचिकांवर सुनावणी घ्यायची आहे. यासाठी किमान एक दिवस आवश्यक आहे. हा विषय दीर्घ काळ प्रलंबित राहिला आहे. पक्षाचे नाव व पक्षचिन्हाबाबतची ही अनिश्चितता अशीच कायम ठेवू इच्छित नाही. हा विषय लवकर निकाली काढायचाय. आम्ही ऑगस्टमध्ये सुनावणी घेण्यास तयार आहोत.

कोर्टात काय घडले?

  • न्यायालय – आम्हाला हा विषय लवकरच निकाली काढायचाय. कृपया दोन्ही पक्षकारांचे वकील युक्तीवाद कधी करु शकता, ते सांगा. आम्ही ऑगस्ट महिन्यात सुनावणी निश्चित करण्यास तयार आहोत.
  • कपिल सिब्बल – महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचे प्रकरण न्यायालयाने लवकरात लवकर निकाली काढावे.
  • शिंदे गटाचे वकील – मध्यंतरीच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. आता मूळ याचिकांवर आदेश दिला पाहिजे, अशी मागणी कशी काय केली जाऊ शकते?
  • न्यायालय – निवडणुका येतील-जातील. परंतु सर्वात आधी मूळ प्रकरणाची सुनावणी करावी लागेल. संध्याकाळपर्यंत सुनावणीची तारीख आम्ही निश्चित करू.