
अमली पदार्थ प्रकरणात अनेक वेळा अज्ञान मुलांचा वापर केला जातो. त्यामुळे आता अमली पदार्थ प्रकरणातही मुलांचे वय 16 वर्षांवरून 14 वर्षांपर्यंत म्हणजे दोन वर्षांनी कमी करण्याबाबतचा विचार सरकारकडून सुरू असून याबाबत लवकरच केंद्राशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना मकोका लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरमधील अमली पदार्थांची विक्री व सेवनाच्या संदर्भात विधानसभा सदस्य विलास भुमरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावरील चर्चेत शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी भाग घेत त्यांनी वांद्रे परिसरातील ड्रग्ज विक्रीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघात बेहरामपाडा आदी भागात अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे. पोलीस या वस्त्यांमध्ये शिरत नाहीत. कमी वयापासून गांजाच्या व्यसनाने सुरुवात होते, पण नंतर हेरॉईनपर्यंत पोहोचतात. त्यात त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. ड्रग्ज व्यवसायात नायजेरियन किंवा आफ्रिकन खंडातील लोक वांद्रे परिसरात वसलेले आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार? मुस्लिम वस्तीत पोलीस कारवाईसाठी पोलिसांना आदेश देणार का, असा सवाल वरुण सरदेसाई यांनी केला.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बेहरामपाडा व इतर भाग आहे. त्यामध्ये निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. कायदेशीर संज्ञेत जे अज्ञान आहेत अशा मुलांना पकडून त्यांच्यावर कारवाई होते, पण ड्रग्जचा व्यवसाय करण्याच्या संदर्भात अज्ञानाच्या संज्ञेमध्ये बदल करून 16 वरून वय दोन वर्षांनी कमी करता येईल का, असा प्रयत्न सुरू आहे.