
मुंबईतील फुटपाथ बेकायदा फेरीवाल्यांनी बळकावले असून त्यावरून चालताना पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. बेकायदेशीर खाद्य पदार्थ विक्रीसह कपडे वाळत घालणे, बांबू लावून ताडपत्री घालणे, संसार थाटने अशी ओळख फुटपाथची झाली असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने यावरून पालिकेवर ताशेरे ओढले. इतकेच नव्हे तर फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश हायकोर्टाने प्रशासनाला दिले.
अनधिकृत बांधकामप्रकरणी पवईतील सोसायटीने याचिका दाखल केली असून या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी फूटपाथच्या दयनीय अवस्थेचे छायाचित्र पाहून खंडपीठ संतापले.
- पालिका अधिकाऱयांच्या डोळय़ासमोर बेकायदा बांधकामे उभी राहतात, पालिका अधिकारीच अशा बांधकामांना खतपाणी घालतात असे फटकारत एखादा अपघात घडल्यास पालिका अधिकारी त्याची जबाबदारी घेणार का, अशी विचारणाही खंडपीठाने पालिकेला केली.
इतर देशांत पहा
खंडपीठाने इतर देशांचाही दाखला दिला. जगभरातील फुटपाथ पहा किती स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असतात, त्यावर कोणतेही अतिक्रमण केलेले नसते, असे फटकारात मुंबईत मात्र स्वच्छ आणि सुस्थितीत फुटपाथ असणे हे एक दिवास्वप्न असल्याचे खंडपीठाने सुनावले.