प्रवीण गायकवाड हल्ल्याचे विधिमंडळात पडसाद, मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्या- प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर आवश्यक ती कलमे लावण्यात येतील व योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना गाडीतून बाहेर खेचून पाडण्यात आले, काळे फासण्यात आले. हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहात केला. संभाजी ब्रिगेडचे गायकवाड यांच्यावर अमानुषपणे हल्ला झाला. या प्रकरणी संबंधित आरोपी एका पक्षाचा कार्यकर्ता असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर पिस्तूल बाळगण्याचा गुन्हा आहे, त्याने चुलत भावाची हत्या केली म्हणून तुरुंगवासही भोगला आहे. या प्रकरणार त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. हल्ला होणार यांचे इंटेलिजन्स नव्हते का? या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त का नव्हता? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सबंधित आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सभागृहाला दिली.

संभाजी ब्रिगेड आणि बामसेफला संपविण्याचा आरएसएसचा कट, गायकवाड यांचा आरोप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संभाजी बिग्रेड आणि बामसेफला संपविण्याचा कट आखला आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी एक बैठक झाली, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला आहे. हल्ला करणारा दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस आहे. सरकार त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.