सरकार आणि पोलीस हे अर्बन नक्षलवाद्यांसारखे वागतायत, संजय राऊत यांचे टीकास्त्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शेतकरी कृष्णा डोंगरे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत एक पत्र लिहले आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकार व महायुतीच्या पोलिसांवर जोरदार टीका केली. ”भाजपची सुपारी घेऊन पोलीस अधिकारी काम करताय. सरकार आणि पोलीस हे अर्बन नक्षलवाद्यांसारखे वागत आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

”मी जे पत्र आज मुख्यमंत्र्यांना पाठवलंय ते व्यथित होऊन पाठवलंय. नाशिकमध्ये पंतप्रधानांच्या सभेत एक कांदा उत्पादक शेतकरी कृष्णा डोंगरे याने आंदोलन केलं म्हणून त्याला अटक केली होती. कृष्णा डोंगरे हे सतत सरकारविरोधात आंदोलन करत असतात. त्याचा राग ठेवून त्यांच्यावरती बलात्काराचा आरोप केलाय. एका भाजप पुरस्कृत शिक्षण संस्था आणि एका शिक्षिकेला हाताशी धरून त्यांना रोखण्यासाठी हा आरोप केलाय. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार ठेवली. तु सरकार विरोधात आंदोलन करायचं नाही नाहीतर तुला ठार मारू हे पोलीस व मंत्र्यांच्या माणसांनी त्याला सांगितलं. ज्या दिवशी बलात्कार झाला, तसा गुन्हा नोंद झाला त्या दिवशी कृष्णा डोंगरे हे कुटुंबासह सप्तशृंगी गडावर देवदर्शनाला गेले होते. धार्मिक कार्यात होते. हे मंदिराच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसलं आहे. त्यावरून कोर्टाने हस्तक्षेप केला त्यानंतर पोलिसांना रिसमरी करावी लागली. तुम्ही जन सुरक्षा कायदा, अर्बन नक्षलवाद अमुक तमुकच्या गर्जना करताय मग अशा पोलिसांसाठी, राजकीय कार्यकर्त्यांसाठी, मंत्र्यांसाठी कोणता कायदा लावणार आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

”नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी शिवसेना फोडण्यासाठी देखील अशाच प्रकार खोटे गुन्हे दाखल केले. काय झालं त्या सगळ्या गुन्ह्यांचं? भाजपची सुपारी घेऊन पोलीस अधिकारी काम करतायत. खोटे गुन्हे दाखल केल्यावर या कार्यकर्त्यांना, नेत्यांना परागंदा व्हावं लागलं. नंतर भाजपच्या उंबरठ्यावर आल्यानंतर त्यांना हात लागला नाही. सरकार आणि पोलीस हे अर्बन नक्षलवाद्यांसारखं वागतंय. कृष्णा डोंगरे सारख्या शेतकऱ्याला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जातायत, त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. नाशिकमध्ये आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाल्यावर, समाज माध्यमांवर आमची बदनामी केल्याबद्दल जाब विचारल्यावर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले व नंतर भाजपमध्ये प्रवेश करायचे ठरवल्यानंतर पोलीस ते गुन्हे मागे घेतात.
लाज वाटली पाहिजे पोलिसांना खाकी वर्दी घालून फिरण्याची. हा निर्लज्जपणा आहे, तुम्ही खाकी वर्दीला लाज आणताय? नाशिक भागात कोणत्या मंत्र्यांच्या दबावाखाली तुम्ही खोटे गुन्हे दाखल करताय. कृष्णा डोंगरें कांद्याच्या प्रश्नावर सातत्त्याने आंदोलन करतंय. म्हणून तुम्ही कृष्णा डोंगरेला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवताय़, कोण करतंय हे, कोणते अर्बन नक्षलवादी आहेत हे, की तुमचे धर्मांध उजवे कडवे आहेत, हा माझा मुख्यमंत्री, नाशिकच्या पोलीस आयुक्तांना सवाल आहे. रश्मी शुक्ला यांनी फक्त आऱएसएसच्या युनिफॉर्ममध्येच वावरायचं बाकी आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.