दिव्या देशमुखचा झू जिनरला धक्का, महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंची दमदार कामगिरी

महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानच्या दिव्या देशमुखने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱया क्रमांकावर असलेल्या चीनच्या झू जिनरला पराभवाचा धक्का देत मोठा इतिहास घडवण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. तसेच आज झालेल्या अन्य लढतींमध्ये आर. वैशाली, हरिका द्रोणावली आणि कोनेरु हम्पी यांनी जोरदार विजयांची नेंद केली.

आज अवघ्या 18 वर्षांच्या नागपूरच्या दिव्या देशमुखने पांढऱया मोहऱयांनिशी खेळताना जबरदस्त खेळ आणि चतुराई दाखवत झू जिनरच्या चुकांना विजयी खेळात परावर्तित केले. या विजयामुळे ती दोन डावांच्या सामन्यात 1-0 अशी आघाडीवर असून दुसऱया डावात फक्त बरोबरी राखली तरी तिला उपांत्यपूर्व फेरी गाठता येणार आहे. जर दिव्या पुढील डावातही विजयी ठरली तर ती महिला वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारी केवळ दुसरी हिंदुस्थानी खेळाडू ठरेल. यापूर्वी 2023 मध्ये हरिका द्रोणावल्लीने अशी किमया साधली होती.

अन्य लढतीमंध्ये आर. वैशालीने कझाकस्तानच्या मेरुएर्त कमालीडेनोव्हा विरुद्ध पांढऱया मोहऱयांनी सावध खेळ केला. हा सामना बरोबरीत सुटला. कोनेरू हम्पीने स्वित्झर्लंडच्या माजी विश्वविजेती अलेक्झांड्रा कोस्टेनियुक विरुद्ध बचावात्मक डाव खेळत बरोबरी साधत अर्धा गुण मिळवला. हरिका द्रोणावल्लीने रशियाच्या कात्येरिना लाग्नोविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. या तिन्ही महिलांनी आपल्या सामन्याच्या पहिल्या डावात बरोबरी साधली असून आता दुसऱया निर्णायक डावात विजय मिळवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.