
रस्त्याने चाललेल्या महिलेचा दुचाकीवरून पाठलाग करून तिला अडविले आणि रस्त्याकडेला असलेल्या जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जोरदार पाऊस आणि डोंगराळ भाग यामुळे महिलेचा आवाज कोणाला ऐकू गेला नाही आणि आरोपीने डाव साधला; मात्र गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे तपास करत 24 तासांत नराधम आरोपीला जेरबंद केले. ही घटना मावळ तालुक्यातील ठाकूरसाई गावात घडली.
बाळू दत्तू शिर्के (रा. जवन नं. 1, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिला 15 जुलै रोजी ठाकूरसाई गावात रस्त्याने चालली होती. दुपारी दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळत होता. आरोपी शिर्के याने महिलेचा दुचाकीवरून पाठलाग करून तिला अडविले. त्याने दुचाकी रस्त्याकडेला उभी केली. महिलेला पकडून जबरदस्तीने जंगलात निर्जनस्थळी नेले.
महिलेने जोरजोरात आरडाओरडा केला; मात्र जोरदार पाऊस आणि डोंगराळ भाग यामुळे तिचा आवाज कोणाला ऐकू आला नाही. आरोपी शिर्के याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. या प्रकारामुळे महिला भेदरली. तिने त्वरित लोणावळा ग्रामीण पोलिसांत धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास पथके तयार करून तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे तपास करत आरोपीचा माग काढला. २४ तासांच्या आत आरोपी शिर्के याच्या मुसक्या आवळण्यात यश आले.
ही कामगीरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक निरीक्षक प्रशांत आवारे, राहुल गावडे, विजया म्हेत्रे, दत्ताजीराव मोहिते, फौजदार अभिजित सावंत, प्रकाश वाघमारे, सचिन घाडगे, दीपक साबळे, आसिफ शेख यांच्या पथकाने केली. सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे तपास करीत आहेत.