शिक्षणभान – करीअर निवड आणि मानसिक गोंधळ

>> आरती बनसोडे

परीक्षेचे निकाल लागले की वेध लागतात कोणते करिअर निवडायचे याचे. या मानसिक गोंधळातून
दूर होण्यासाठी काही टिप्स नक्कीच उपयोगी पडतील.

पूर्वी दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले की, ठरावीक करीअर निवडले जायचे. कारण करीअर म्हणून निवडायला जास्त विकल्प उपलब्ध नव्हते, पण आताच्या परिस्थितीत घरोघरी पालकांची एकच लगबग सुरू असते ती म्हणजे, आता पुढे आडमिशन कुठे घ्यायचे, कुठल्या वाटेला जायचे, कोणते करीअर आपल्या मुलांसाठी योग्य असेल? पूर्वी करीअर निवडीचा इतका गोंधळ झालेला आपण बघितला नव्हता, पण हल्ली जितके जास्त विकल्प, तितका जास्त गोंधळ होतो. एक कोर्ससाठी शंभर महाविद्यालये उपलब्ध असतात. मग त्यातून नक्की कोणते करीअर निवडायचे हादेखील प्रश्न असतो. शिवाय हल्ली रेग्युलरपेक्षा इंटिग्रेटेड विद्यालयात प्रवेश घेणे जास्त पसंत केले जाते. त्यामुळे नक्की आपल्यासाठी काय योग्य आहे या संभ्रमात पालक आणि विद्यार्थी असतो.

सगळ्यांनी आधी हे समजून घेणे आवश्यक आहे की, करीअर म्हणजे नक्की काय आणि ते निवडताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतल्यास पुढील मार्ग सुखकर होईल?

करीअरची निवड चुकीची नसते, पण ती निवड झाल्यानंतर योग्य दिशा न मिळाल्यास नंतर मात्र पश्चात्तापाची वेळ येते. ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद, समाधान आणि सुखकारक जीवन जगण्याइतपत पैसे मिळतात, जी गोष्ट करताना आपल्याला थकवा जाणवत नाही, कुणी जबरदस्ती आपल्यावर लादल्यासारखे वाटत नाही, त्या गोष्टी करीअर म्हणून निवडल्यास पुढे सुखकारक वाटते. कारण मानसिक समाधान आणि शांती या पुढील जीवनामध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी असतात.

एकदा घेतलेला निर्णय पुढे जाऊन बदलणे इतके सोपे नसते आणि यामध्ये वेळ व पैसे वाया जाऊन मुलांना, त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप होतो. त्यामुळे योग्य सल्ला घेऊन करीअर निवडणे आणि निवडलेल्या करीअरला यशस्वीपणे आनंदात निभावणे फार महत्त्वाचे असते. यासाठी मुलांच्या आवडीनिवडी, व्यक्तिमत्त्व, कल आणि त्यांची बुद्धिमत्ता यांची सांगड घालून त्यांना दिशा दाखवणे ही पालकांची मूलभूत जबाबदारी आहे.

मुलांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करता त्यांच्या आवडीप्रमाणे करीअर निवडायला पालकांनी मदत करणे आवश्यक असते. विद्यार्थी केवळ इंजिनीअर, डॉक्टर व्हावा या अपेक्षा बदलल्या पाहिजेत. हल्ली या गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये मतभेद होऊन करीअर कौन्सिलिंग ही संकल्पना जोर धरत आहे. ज्यामध्ये मुलांच्या विविध आयक्यू चाचण्या, अॅप्टिटय़ूड टेस्ट, ब्रेन मॅपिंग, डीएमआयटी अशा विविध चाचण्या करून मुलांचा कल ठरवून करीअर निवडीसाठी मार्गदर्शन केले जाते. या चाचणीचे निकष खरे असतीलच असे नाही. कारण विद्यार्थ्यांची आवडनिवड, कल, व्यक्तिमत्त्व या गोष्टी मूल आणि पालकांनी आपापसात चर्चा करणे अधिक प्रभावीपणे करीअर निवडीसाठी उपयुक्त ठरते. बऱयाचदा मुलांना करीअर करायची इच्छा असते, परंतु घरातली आर्थिक परिस्थिती पाहता मुलांना त्यांच्या आवडीचे करीअर करणे शक्य होत नाही. कधी कधी मुलांना व पालकांना विविध नवीन क्षेत्रांची माहिती नसल्याने त्यांना करीअरची निवड करणे जमत नाही.

हल्ली नृत्य, गायन किंवा चित्रकला यांसारख्या सगळ्या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण उपलब्ध आहे, जे प्राप्त करून स्वतचा व्यवसाय करता येतो. त्याचप्रमाणे परदेशामध्ये जाऊन नोकरीसोबतच आपल्या कलादेखील सादर करता येतात. कोणत्याही व्यवसायाला आपली निवड बनवून त्यातून पैसा कमावणे हे आता इतके कठीण राहिलेले नाही.

निवडलेल्या करीअरमध्ये आनंद कसा मिळवायचा हे आपल्या हातात असते. निवडलेले करीअर यशस्वी बनवणे आणि आनंदी राहणे जमले तर करीअरच्या वाटा निवडताना भावनिक पसारा होणार नाही.