
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दिल्लीतील हरियाणा भवन येथे 50 मुस्लिम धर्मगुरू आणि बुद्धिजीवींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. अखिल भारतीय इमाम संघटनेने आयोजित केलेल्या या बैठकीत इमामांमध्ये एकता, सहकार्य वाढवणे, धार्मिक-सामाजिक मार्गदर्शन, आंतरधार्मिक संवाद आणि सांस्कृतिक विकासाला चालना देण्यावर चर्चा झाली. बैठकीला संघाचे सर कार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सह सरकार्यवाह कृष्ण गोपाल, रामलाल आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे इंद्रेश कुमार उपस्थित होते. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. उमर अहमद इलियासी यांच्यासह अनेक नामवंत विद्वान आणि विचारवंत सहभागी झाले.
या बैठकीचा उद्देश समाजातील सलोखा, परस्पर समज आणि सामाजिक ऐक्य वाढवणे हा होता. हिंदू-मुस्लिम समाजांमधील गैरसमज दूर करून शांतता आणि सहअस्तित्वाला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन, जी हिंदुस्थानातील सुमारे पाच लाख इमामांचे प्रतिनिधित्व करते, आंतरधार्मिक शांततेसाठी कार्यरत आहे. यापूर्वीही मोहन भागवत यांनी डॉ. इलियासी यांच्या निमंत्रणावरून मशिदीला भेट दिली होती.




























































